‘यास’ चक्रीवादळाच्या तडाख्याने हाहाकार; ताशी 155 किमी वेगाने धडकले वारे, पश्चिम बंगालमध्ये तब्बल 3 लाख घरांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या पूर्व किनारपट्टीवरील उत्तर ओडिसा व पश्चिम बंगालमध्ये बुधवारी ‘यास’ चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला. सुरुवातीला समुद्रात घोंघावणारे चक्रीवादळ पुढे ताशी तब्बल 155 किमी वेगाने किनारपट्टीवर धडकले. ओडिशात जवळपास चार तास या चक्रीवादळाने भीषण कहर केला. यात घरे, नागरी सुविधांचे प्रचंड नुकसान झाले, तर शेकडो झाडे जमीनदोस्त झाली. पश्चिम बंगालमध्ये तब्बल तीन लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले असून याचा एक कोटी लोकांना फटका बसला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ‘यास’ चक्रीवादळ समुद्रातून ओडिशात धडकले. सर्वात आधी धामरा बंदराच्या उत्तरेला आणि बालासोर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागाला वादळाचा तडाखा बसला. त्यानंतर किनारपट्टी भागात ताशी 140 ते 155 किमी वेगाच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. ओडिशाबरोबरच पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत असलेल्या पूर्व मिदनापूर आणि दक्षिण 24 परगणा या भागांनाही चक्रीवादळाचा तडाखा बसला.

वादळाची तीव्रता कमी होणार–हवामान खाते

लँडफॉल झाल्यानंतर वादळाने उत्तर आणि उत्तर-पश्चिम असा प्रवास सुरू केला आहे. झारखंडकडे जाताना अतितीव्र चक्रीवादळाचे आधी तीव्र चक्रीवादळ आणि त्यानंतर पुढच्या 6 तासांत चक्रीवादळात रुपांतर होईल. वादळाचा वेग साधारणपणे ताशी 60 ते 70 किलोमीटरपर्यंत नियंत्रणात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र समुद्र खवळलेलाच राहील आणि जोरदार पावसाचा तडाखा बसेल. चक्रीवादळाचा आसाम-मेघालयपर्यंत परिणाम दिसेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

झारखंडमध्ये ‘हाय अॅलर्ट’; उत्तर प्रदेश, बिहारही सतर्क

ओडिशा, बंगालमध्ये हाहाकार उडवल्यानंतर चक्रीवादळाने झारखंडकडे मोर्चा वळवला आहे. हे वादळ गुरुवारी सकाळपर्यंत झारखंडमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर झारखंडच्या सखल भागांतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. दोन दिवसांत लाखो लोकांचे स्थलांतर केले गेले. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आदी राज्येही वादळाच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क आहेत.

चक्रीवादळाचा विमान आणि रेल्वे सेवेला मोठा फटका बसला. कोलकाता आणि भुवनेश्वर विमानतळावरून विमान सेवा पूर्णपणे बंद ठेवली होती. तसेच ओडिशा आणि बंगालच्या सर्व रेल्वे फेऱया रद्द करण्यात आल्या. याशिवाय बिहार आणि झारखंडच्या रेल्वे गाडय़ा रद्द केल्या आहेत. मुंबईतून भुवनेश्वरला जाणारी सहा विमान उड्डाणे रद्द करण्यात आली.