वायच् कळ काढा! निर्बंध वाढणार!! मंत्रिमंडळात आग्रह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात येत असला तरी राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. ही चिंतेची बाब असल्याने 1 जूननंतरही लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अर्थात ज्या जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात आहे त्या जिल्ह्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जातील. त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्सशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय जाहीर करतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. त्यामुळे  कडक निर्बंध शिथिल होण्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला ‘वायच् कळ काढावी’ लागणार आहे. सरसकट राज्यभरातील कडक निर्बंध शिथिल करू नयेत यावर सर्वच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आग्रह धरला.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि याबाबत सविस्तर माहिती दिली. लसीकरणाबाबत विचारेल्या प्रश्नाला उत्तर देताना टोपे म्हणाले, फायझर कंपनीने पंजाबला स्पष्ट सांगितले आहे की आम्ही लस राज्यांना नाही तर केंद्र सरकारला देणार आहोत. ग्लोबल टेंडर संदर्भात जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, स्पुटनिक, स्ट्राझेन्का या कंपन्यांनी त्यांच्या मार्केटिंग एजन्सीमार्फत टेंडर भरली आहेत.मात्र काही कंपन्यांनी रेट भरले नाहीत. त्यामुळे लसींच्या आयातीसंदर्भात केंद्र सरकारनेच आता राष्ट्रीय धोरण ठरवावे अशी विनंती आपण केंद्र सरकारला करणार आहोत.

ग्रामीण भागात योग्य पदतधीने होम आयसोलेशन अंमलात आणता येऊ शकत नाही.त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने गावातील शाळा, मंगलकार्यालयातील सुविधांमध्ये रहावे व तिथे राहणाऱ्या सगळयांना औषधांपासून इतर सर्व सुविधा पुरविल्या जातील असेही टोपे यांनी सांगितले.

टप्प्याटप्प्याने सवलती देणार

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. आजची राज्यातील रुग्णसंख्या कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारी एवढी झाली आहे. मात्र आपल्याला अजून काळजी घेणे आवश्यक आहे.

राज्यात लावलेल्या लॉकडाउनमुळे रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली आहे.  7 लाखांपर्यंत पोहोचलेली रुग्णसंख्या 3 लाख 15 हजारांपर्यंत खाली आली आहे.

अद्यापही राज्यातील 21 जिल्हय़ांत राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे. या मुद्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.

मात्र लॉकडाउन सरसकट उठविला नाही तरी त्यात शिथिलता मात्र देण्यात येणार आहे.मग ती शिथिलता कशी द्यायची, दुकानांची वेळ किती वाढवायची, आणखी कोणत्या प्रकारच्या दुकानांना अथवा इतर आस्थापनांना उघडण्याची परवानगी द्यायची किंवा नाही याबाबत टास्कफोर्स तसेच आरोग्य विभागासोबत चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घोषित करतील असे राजेश टोपे म्हणाले.

लॉकडाऊन उठविण्यासंदर्भात पॉझिटिव्हिटी रेट आणि बेडची उपलब्धता हा महत्वाचा निकष असतो. तो लक्षात घेता सरसकट लॉकडाऊन उठविणे योग्य ठरणार नाही या मुद्यावर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांचेच एकमत झाले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.