नगर जिल्ह्यामध्ये टंचाईच्या काळात पाणीपुरवठा करणाऱया टँकरमधून दोन वर्षांत सुमारे 102 कोटींचा घोटाळा करून सरकारी रक्कम हडप केल्याच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आजपासून शुक्रवार (दि. 28) टँकर घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे. यामुळे टंचाई विभागातील अधिकारी, कर्मचाऱयांसह पाणीपुरवठा करणाऱया संस्था रडारवर आल्या आहेत.
नगर जिह्यात 2019-20 या वर्षात दुष्काळी स्थिती होती. या काळात लोकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी सुरू असलेल्या टँकरचा आकडा 950 पर्यंत गेला होता. त्या वर्षी तीन महिन्यांत पाणीपुरवठा करणाऱया टँकरवर तब्बल 102 कोटी रुपये वाटप केले. पाणीपुरवठा करणाऱया टँकरच्या वाहतुकीचे अंतर बरोबर आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित होती. शिवाय जेवढय़ा खेपांच्या रकमा वाटप केल्या, तेवढय़ा खेपा झाल्या का यासह अन्य बाबतींत शंका
असल्याने पारनेर येथील लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे व बबन कवाद यांनी माहिती अधिकारातून माहिती घेतली. त्यात त्यांना तफावत आढळली. जीपीएस यंत्रणेचे दुय्यम अहवाल, वाढलेल्या खेपा, अंतर व वेळेत तसेच टँकरची पाणी
वाहतूक क्षमतेत तफावत असल्याचे दिसून आले होते. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने याबाबत न्यायालयात तक्रार केली होती.
पाच वर्षांची चौकशी होणार
n टँकर घोटाळ्याबाबत रामदास घावटे व बबन कवाद यांनी माहिती घेऊन 2019-20 या वर्षातील चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, नगर जिह्यात गेल्या पाच वर्षांत टँकर, पाणीपुरवठय़ावर कोटय़वधींचा खर्च झाला आहे. त्यामुळे एक वर्षाची नव्हे, तर मागील पाच वर्षांची चौकशी केली जाणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. चौकशी पथकाने मागणी केल्यानुसार कागदपत्रे उपलब्ध करून देत संबंधितांनी हजर राहण्याचे आदेशात नमूद केले आहे.































































