
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2022 ला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या अधिकाऱयांसोबत नुकतीच ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत मतदार याद्या, आरक्षण, प्रभाग रचना यावर चर्चा करण्यात आली असून सर्वात पहिल्यांदा प्रभागांची फेररचना करून त्यांना अंतिम स्वरूप देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दरवेळी प्रभागांचा आढावा घेतला जातो. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या पाच वर्षांनी येणाऱया निवडणुकीतही प्रभाग रचनेचा आढावा घेऊन आवश्यकता भासल्यास त्यानुसार फेररचनाही केली जाते. प्रभाग रचनेसाठी लोकसंख्या, लोकवस्ती तसेच अन्य काही बाबींचा विचार केला जातो. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी पालिका अधिकाऱयांना निर्देश दिले असून निवडणुकीसंदर्भात आवश्यक माहिती गोळा करण्यास सांगितले आहे. आज झालेली बैठक ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. या बैठकीत मागील निवडणुकीची माहितीही राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली. त्याचप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांना अंतिम स्वरूप देण्याचे काम, नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी कार्यक्रम आदी बाबींची तयारी करण्यास सांगण्यात आले आहे.
z 2017 च्या निवडणुकीत प्रभाग रचनेत बदल करण्यात आले होते. त्यावेळी सात प्रभाग कमी झाले होते. त्याचबरोबर चेंबूर, घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, वांद्रे पूर्व या भागातील प्रत्येकी एक प्रभाग घटला होता. दुसऱया बाजूला उत्तर मुंबईतील गोरेगाव, दहिसर येथील प्रत्येकी एक आणि मालाड, कांदिवली येथील प्रयेकी दोन प्रभाग वाढले होते.


























































