
>> यादव तरटे-पाटील
पर्यावरण, जंगल व जैवविविधता ही एक व्यापक संज्ञा आहे, जी जंगल क्षेत्रातील आणि त्यांच्या पर्यावरणीय भूमिकेतील सर्व जिकंत जीवनाशी संबंधित आहे. ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने चर्चा होत असताना पर्याकरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू असावा असे वाटते.
ज्ञात ग्रहांपैकी पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. निर्मितीच्या प्रक्रियेत पृथ्वीवर वेगवेगळे सजीव निर्माण झालेत. उक्रांतीनुरूप त्या सजीवसृष्टीत नियमन व त्यानुरूप बदल होत गेले. मानवासकट संपूर्ण सजीवसृष्टी सहजीवनाचा धागा धरून सुखासमाधानाने नांदत होती. मात्र मानवप्राणी यात बराच पुढे निघाला. वनवासी, ग्रामवासी व नगरवासी अशी त्रिस्तरीय वस्तीव्यवस्था निर्माण झाली. यातच मानवप्राणी आपल्या बुद्धीनुरूप इतर सजिवांवर वेगवेगळे प्रयोग करू लागला. कालांतराने खेडी निर्माण झालीत, आता शहरे प्रचंड फुगायला लागलीत. निसर्गाचा अविभाज्य घटक असलेला मानवप्राणी मात्र जंगल व जैवविविधतेपासून दुरावत गेला. आज या नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. मानव स्वतः ज्याचा घटक आहे तीच पृथ्वीवरील संपन्न जैवविविधता धोक्यात आली आहे. जंगलातीलही अन्नजाळे व अन्नसाखळी कमालीची प्रभावित झाली आहे. काही सजीव नष्ट झालेत तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरण व परिस्थितीचा घटक असलेला मानवप्राणी या विनाशाला कारणीभूत ठरतो आहे हे भयंकर वास्तव आहे. जैवविविधता व जंगलाच्या सहजीवनाचा हा प्रवास विनाशाच्या उंबरठय़ाकडे जातोय.
पर्यावरण, जंगल व जैवविविधता ही एक व्यापक संज्ञा आहे, जी जंगल क्षेत्रातील आणि त्यांच्या पर्यावरणीय भूमिकेतील सर्व जिवंत जीवनाशी संबंधित आहे. केवळ झाडांवरच नाही तर विविध प्रकारच्या प्राणी, पक्षी, फुलपाखरे, कोळी आणि सूक्ष्मजीव जंगल भागात राहतात. त्यांची गुणसूत्र विविधता असते. परिस्थितिकी, भूप्रदेश, प्रजाती, जीवसंख्या, जीवसमुदाय, अनुवंशिकीसह विविध स्तरांवर हे आपण सहज समजून घेऊ शकतो. या स्तरांमध्ये आणि त्यांच्या दरम्यान काही गुपित संवाद असू शकतात. जंगलातील जैवविविधतेमध्ये ही गुपितता प्राण्यांना त्यांच्या सतत पर्यावरणीय परिस्थितींमध्ये व्यवस्थापित करण्यात मदत करते. या दृष्टीने जंगल, जैवविविधता आणि पारिस्थितिकी तंत्र अधिक कार्यक्षम ठरते.
गेल्या 8000 वर्षात, पृथ्वीच्या मूळ जंगलाच्या 45 टक्के जंगल भाग नाहीसा झालाय. यातील बहुतेक भाग गेल्या शतकात कमी झालाय. अन्न व कृषी संघटनेच्या अंदाजामध्ये पिकांच्या कापणीमुळे दरवर्षी 13 दशलक्ष हेक्टर क्षेत्रफळ प्रभावित होते. सन 2000 ते 2005 दरम्यान वन क्षेत्राचे वार्षिक नुकसान 73 लाख हेक्टर इतके आहे. हे क्षेत्र जगाच्या जंगल क्षेत्राच्या 0.18 टक्के एवढे आहे. जंगल प्रभावित झालं म्हणजेच जैवविविधता प्रभावित होणारच. वन, आरोग्य, कौशल्य, जैवविविधता, पारिस्थितिकी तंत्रांचे व्यवस्थापन, हवामानातील बदल कमी करणे यासारख्या उद्दिष्टे आणि सेवा या जंगलांचा महत्त्वाचा भाग मानल्या जातात. जैवविविधता अधिवेशनात जंगलांना जैविक विविधतेच्या विस्तृत कार्यक्रमाचे स्वरूप देण्यात आले आहे. सन 2002मध्ये यासंदर्भातील सदस्य देशांच्या सहाव्या बैठकीत हा निर्णय स्वीकारण्यात आला. जंगल आणि जैवविविधतेचे संरक्षण, जंगल अनुवांशिक स्त्राsतांचा उचित वापर आदींवर लक्ष केंद्रित केलेले उद्दिष्ट आणि कार्ये समाविष्ट आहेत. जैवविविधता कार्यक्रमात काही महत्त्वाचे तथ्य समाविष्ट आहेत; ते संवर्धन, संरक्षण, टिकाऊ वापर, नफा सामायीकरण, संस्थात्मक आणि सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा योग्य वातावरण, ज्ञान मूल्यांकन आणि देखरेख अशा विविध तत्त्वावर आधारित आहे. महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण विभागाने हाती घेतलेले ‘माझी वसुंधरा’ अभियान यासंदर्भात अतिशय महत्त्वाचे आहे.
हिंदुस्थान जागतिक दहा देशांतील जैवविविधतेत आठव्या क्रमांकावर असला तरी हिंदुस्थानात प्रतिवर्षी 14 लाख हेक्टर जंगल नष्ट होते. सन 2005 ते 2011 या कालावधीत एकटय़ा महाराष्ट्रात 6,637 हेक्टर वनक्षेत्र नवीन रेल्वेमार्ग, वीजनिर्मिती प्रकल्प, खाण व्यवसायामुळे कमी झाले आहे. जंगल आणि जैवविविधता हे परस्परपूरक घटक आहेत. जंगल जैवविविधतेला जीवन देते तर जंगल स्वतःदेखील जैविविविधतेचाच घटक आहे. जंगलातील लता, वेली, झुडपे, वृक्ष यांवर जैवविविधता नांदते तर वाघापासून ते वाळवीपर्यंतची संपूर्ण जैवविविधता जंगलाला जगविते. उदाहरणार्थ जंगलातील झाडांवर कीटकांचं जीवन अवलंबून आहे, तर हीच झाडं मृत पावल्यावर त्याला कुजवून नवीन वनस्पती व झाडांना खतनिर्मिती करण्याचं कार्य कीटक करतात. सहजीवानाच्या धाग्याने घट्ट जोडल्या गेलेल्या आणि परस्परपूरक असलेल्या या नात्यात आपण हस्तक्षेप करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. मानवाला ऑक्सिजन देणारी झाडे, परागीभवनातून अन्न देणाऱया मधमाशा, फुलपाखरे व इतर कीटकसृष्टी हे सर्व जंगल जैवविविधता यांतील मुख्य घटक आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने निसर्गपूजक पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या पचतत्वांवर आधारीत जीवनपद्धती जगण्यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने ‘माझी वसुंधरा अभियान’ असा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबविला जातोय. यासाठी ग्रामपातळीपासून ते नगर व शहरपातळीवर अनेक पर्यावरणपूरक उपक्रम जसे की, जैवविविधतेचे अस्तित्व टिकवून ठेवणे, पर्यावरण संवर्धन, वातावरणातील बदलांनुसार घडणाऱया घटनांचे परिणाम सहन करण्याची सवय निर्माण व्हावी, यासाठीचे हे ‘माझी वसुंधरा’ अभियान आहे. या अभियाना अंतर्गत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम करण्यात येत आहे. त्यात पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, जमिनीची धूप थांबवणे इत्यादीबाबत प्राधान्याने विचार केला गेलाय. वायू तत्त्वासाठी प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित नदी संवर्धन, सागरी जैवविविधता संवर्धन, जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण आणि स्वच्छता, अग्नी तत्त्वानुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर करणे, ऊर्जा बचत करून ऊर्जेचा अपव्यय टाळणे, अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात यावेत यासाठी भर देण्यात आलाय. आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणाऱया बदलांसाठी जनजागृती करणेसुद्धा यात अपेक्षित आहे. सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, स्थानिक पर्यावरणप्रेमी व स्थानिक प्रशासन अशा चार महत्त्वाच्या विकेंद्रित खांबावर उभे करण्यात आलेले ‘माझी वसुंधरा’ अभियान सतत व समवर्ती पद्धतीने राबविणे आवश्यक आहे. तरुण पिढीला आकर्षित करून नव्याने पर्यावरणपूरक जीवनशैली जगण्याचा पायंडा पाडण्यात हे अभियान नक्कीच मैलाचा दगड ठरणार आहे. महाराष्ट्र राज्याचे तरुण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व पर्यावरण विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह महाराष्ट्र शासनाने दिलेल्या हाकेला आता नागरिकांनी एकमताने व एकजुटीने प्रतिसाद देण्याची हीच खरी वेळ आहे. आपल्याला जगविणारे जल, जमीन, जंगल व जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन करण्याचा शाश्वत संकल्प या पर्यावरण दिनी आपण करुया. आपणच आपल्या संवर्धनासाठीची एक चळवळ उभी करुया.
(लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव
मंडळाचे सदस्य आहेत)
n www.yadavtartepatil.com































































