
>> राहुल गोखले
मराठीत दमदार विज्ञानकाल्पनिका लिहिणारे लेखक हाताच्या बोटांवर मोजावेत इतकेच. तेंव्हा खरेतर तरुण, नवोदित लेखकांनी ही वाट आवर्जून चोखाळावी अशीच. सौरभ वागळे हे नव्या दमाचे लेखक आहेत आणि रहस्यकथांसह विज्ञानकथांच्या क्षेत्रात ते मुशाफिरी करीत आहेत. त्यांच्या या आश्वासकतेचे प्रतिबिंब त्यांच्या ‘मिशन अर्था’ या विज्ञानकथा संग्रहात पडलेले दिसते.
हा कथासंग्रह छोटेखानी आहे आणि त्यात तीन कथांचा समावेश आहे. मात्र त्या तिन्ही कथांत एक सूत्र दिसते आणि ते म्हणजे पृथ्वीच्या भवितव्याच्या चिंतेचे. पहिली कथा ही ज्यावरून पुस्तकाला शीर्षक देण्यात आले आहे ती ‘मिशन अर्था’ हीच कथा आहे. टिटॅन नावाच्या ग्रहावर हे नाटय़ घडते. या ग्रहाच्या स्पेस एजन्सीतून पेनॉर स्पेसक्राफ्ट अवकाशयात्रींना घेऊन वातावरणाच्या बाहेर पडते या प्रसंगाने कथेला सुरुवात होते. मात्र तेथील संशोधकांना वेध लागले आहेत ते ‘अर्था’ मिशनचे. स्पेस एजन्सीचे प्रमुख प्रत्यंकार यांना ती मोहीम यशस्वी करून दाखवायची आहे. लेखकाने टिटॅन या सॅट्रीनोच्या उपग्रहावर मानवाची किती प्रगत सुष्टी वसली आहे याचे वर्णन केले आहे आणि त्यावरून आताच्या काळापेक्षा हा खूप पुढचा आणि प्रगत काळ कल्पिला आहे हे वाचकांच्या लक्षात येईल. दीड महिन्यानंतर पेनॉर हे स्पेसक्राफ्ट अर्था ग्रहाच्या मुनॉस या उपग्रहावर पोचते आणि तेथून कथेला कलाटणी मिळते. याचे कारण तेथे उमटलेली काही पावले आणि मिळालेली एक धातूची पट्टी. या उपग्रहावर आपणच पहिले पाऊल ठेवले या प्रत्यंकार यांच्या कल्पनेला तेथे धक्का बसतो आणि मग ती पावले कोणाची व ती धातूची पट्टी नेमके काय सांगते याचा शोध सुरू होतो. त्या शोधात मग अंतर्भाव होतो इतिहास संशोधक वित्रोमा यांचा. मुनॉसवर आढळलेल्या त्या धातूच्या पट्टीच्या प्रतिमा पाठवल्या जातात आणि वित्रोमा कामाला लागतात. ते जो शोध लावतात तो सगळ्यांनाच धक्का देणारा असतो. धातूवर जे लिहिलेले असते त्याची लिपी अर्थातच अगम्य असते आणि म्हणून वित्रोमा आपले सगळे ज्ञान पणाला लावून त्याचा अर्थ लावतात. त्या पट्टीवर रोमन लिपीतील अक्षरे असतात आणि इसवी सन 1969 अशी अक्षरे त्यावर नमूद केलेली असतात. वित्रोमा मग सगळा खुलासा करतात. टिटॅनवर आता मानवसृष्टी असली तरी मुळात पृथ्वी सोडून मानवाला ही नवी उक्रांती का करावी लागली याचे कुतूहल वाढविणारे कथानक लेखकाने लिहिले आहे आणि ते मुळातूनच वाचले पाहिजे.
‘कॉमेंट एक्स’ या दुसऱया कथेचे कथनाक हिंदुस्थानच्या सीमेवर घडते. मात्र त्याला पार्श्वभूमी आहे ती हिंदुस्थानात आणि चीनमध्ये झालेल्या काही गूढ मृत्यूंची. कोणताही उघड पुरवा नसतानाही आणि नैसर्गिक मृत्यूची कोणतीही लक्षणे नसताना दोन्ही देशांतील उच्चपदस्थांचा मृत्यू होतो. लेखकाने ते गूढ चांगले रंगविले आहे. या मृत्यूंचे रहस्य शोधून काढण्याचे काम अल्फा या गुप्तहेराकडे सोपविण्यात आलेले असते. या शोधादरम्यानच हिंदुस्थानच्या सीमेवर डोंगराळ प्रदेशात एक उल्का कोसळलेली असते. त्या दूरवरच्या एका उल्केचा, परग्रहवासीयांचा आणि या मृत्यूंचा काय संबंध असतो याचा छडा अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव कसा लावतात याचा मागोवा म्हणजे प्रस्तुत कथा. तिसरी कथा ‘एच टू ओ’. 2120 साली या घटना घडतात अशी ही काल्पनिका. आसाममध्ये मोठे भूजल साठे सापडतात. पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱया त्या काळात असे साठे सापडणे म्हणजे जल्लोषाची घटना. पाण्याचा वापर अंतर्गत करावाच पण पाण्याची आयातदेखील करावी. कारण युरोपीय देश कोणतीही किंमत देऊन ते खरेदी करतील अशी कल्पना सुचविण्यात येते. तथापि अंतरारराष्ट्रीय नियमांनुसार त्या भूजल साठय़ांवर सर्वस्वी दावा करता येत नाही. परंतु मुळात पाण्याची मुबलकता असणाऱया देशात पाण्याची तीव्र टंचाई का उत्पन्न होते, केवळ तीनच नद्या कशा अस्तित्वात राहतात, खाऱया पाण्याचे शुद्धीकरण करून पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती कशी करावी लागते याचे वर्णन करून लेखक भीषणतेचे चित्र रेखाटतो. देश महासत्ता झालेला आहे, पण पाण्याची मात्र तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे अशा तऱहेच्या या कथानकात तरीही देश आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱया आणि उदारमतवाद विसरत नाही हे दाखवून लेखक एका अर्थाने आताच्या जागतिक राजकारणात आपल्या बळाच्या आधारावर हडेलहप्पी करणाऱयांवर अप्रत्यक्ष कोरडे ओढतो. कथेतील विविध पात्रांच्या तोंडी असलेल्या संवादांतून लेखक तंत्रज्ञान, पर्यावरणस्नेही नसले तर कशी अवस्था होऊ शकते याकडे आणि त्या भविष्यकाळातील जलटंचाईला आधीच्या पिढय़ांनी पाण्याचा केलेला हव्याशी वापर कसा कारणीभूत आहे याकडे अंगुलीनिर्देश करतो.
कथांत एक प्रकारचे सूत्र दिसते आणि ते म्हणजे वर्तमानात जर पर्यावरणाची हेळसांड केली तर भविष्य हे अतिशय भयानक असू शकते याचा घेतलेला वेध. विज्ञानकथा लिहिताना त्यात जशा वैज्ञानिक संकल्पना लागतात तद्वत कथानक आणि नाटय़देखील भक्कम असावे लागते. लेखकाने हे जमविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. यापुढेही अधिकाधिक प्रगल्भ विज्ञानकथा प्रस्तुत लेखक वाचकांच्या भेटीस आणेल ही आश्वासकता या कथांत दिसते.
मिशन अर्था (पुस्तक ई-पुस्तकाच्या स्वरूपात)
लेखक : सौरभ वागळे
प्रकाशक : ई-साहित्य प्रतिष्ठान, ठाणे
पृष्ठे : 79































































