
भरधाव वाहनचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर परिसरातील सातववाडीतील जेष्ठ नागरिक संघासमोरील रस्त्यावर घडली. हा अपघात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला असून ओंकार राउत असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अजित मोडक (25 रा. सासवड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ओंकार सोमवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास दुचाकीवरून सासवडहून पुण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी सातववाडीत रस्त्यावर अज्ञात वाहनचालकाने त्याला धडक दिली. यात ओंकार गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. जी. थोरात तपास करीत आहेत.
बांधकामादरम्यान कामगाराचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडल्यामुळे कामगार ठार झाल्याची घटना लोहगावमधील सैनिक वसाहतीत घडली. मल्लेश बसप्पा चलवादी (28, रा. लोहगाव) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. ही घटना 24 मे ला घडली होती. याप्रकरणी सुरक्षिततेची साधन सामुग्री न पुरविल्याप्रकरणी ठेकेदाराविरूद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.























































