प्रशांत किशोर यांची 3 तास शरद पवारांशी चर्चा, दिवसभर तर्क आणि वितर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मेठे यश मिळवून दिल्यावर प्रशांत किशोर यांनी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत येऊन सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत.

पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. मात्र, भाजपला या ठिकाणी तीन अंकी आकडाही गाठता आला नाही. यानंतर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांचा चेहरा म्हणून कोण असणार यासंबंधीच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल कॉँग्रेससाठी रणनीती आखणारे प्रशांत किशोर यांची शरद पवार यांच्याशी झालेली भेट ही देशातील आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

राष्ट्रवादीची लंच डिप्लोमसी

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी प्रशांत किशोर सकाळी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी पवारांसोबत दुपारचं जेवणही केलं. या दोघांत तब्बल तीन तास चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच पुढील काळात राष्ट्रवादीची रणनीती आणि राजकीय कार्यक्रमाबाबत यावेळी चर्चा झाली. ही भेट संपल्यानंतर शरद पवार आमदार रोहित पवार यांच्यासह पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

सल्ला घेण्यासाठी अनेक नेते भेटतात – अजित पवार

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी अनेक नेते भेटत असतात, त्यापैकीच ही भेट आहे. प्रशांत किशोर यांनी मी कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे भेटीत राजकारण असण्याचं पिंवा त्या क्षेत्राची चर्चा होण्याचं कारण नाही. असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

बैठकीत गैर काहीच नाही – संजय राऊत

प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला निवडणुकांमध्ये यश मिळालं आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मममा बॅनर्जी व प्रशांत किशोर यांनी जी रणनीती आखली ती यशस्वी ठरली. हे जाणून घेण्यासाठी अनेक नेते, राजकीय पक्ष इच्छुक असतात. या बैठकीत गैर काहीच नाही. अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

निवडणुकीबाबत चांगला हातखंडा – छगन भुजबळ

प्रशांत किशोर यांनी वेगवेगळय़ा निवडणुकांत सल्ले दिले आहेत. मदत केली आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने गेल्यावर यशसुद्धा आलेलं आहे. प्रशांत किशोर यांचा निवडणुकीबाबत चांगला हातखंडा आहे. मात्र शरद पवार आणि त्यांच्या भेटीत काय घडलं याबाबत कल्पना नाही. त्यांनी काही सल्ला दिला असेल तर त्याचा शरद पवार नक्कीच विचार करतील. असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले.

नवीन पिढीशी सल्लामसलत

प्रशांत किशोर यांनी सिल्व्हर ओकवरील भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या नव्या पिढीसोबतही सल्लामसलत केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलदेखील काही काळ चर्चेत सहभागी झाले. आमदार रोहित पवारही यावेळी उपस्थित होते.

राजकीय वर्तुळात चर्चा

मोदी आणि शहा यांच्याविरोधात योग्य रणनीती आखली तर त्यांचा पराभव केला जाऊ शकतो हा आत्मविश्वास प्रशांत किशोर यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीने दिला. त्यामुळेच आता प्रशांत किशोर देशभर भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

देशपातळीवर यूपीएच्या नवीन नेतृत्वाचाही सध्या शोध सुरु आहे. यामध्ये शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग केला जाणार का, अशी चर्चा आहे.

शरद पवार यांचे देशातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी जिव्हाळय़ाचे संबंध आहेत. त्यामुळे या सर्व पक्षांना भाजपविरोधात उभं करायचं असेल तर शरद पवार हा हुकमी एक्का आहे याची कल्पना प्रशांत किशोर यांना आहे. त्यामुळेच त्यांनी पवार यांची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केला आहे.