
देशातील सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन मजबूत आघाडी तयार करणे गरजेचे आहे; पण ही आघाडी काँग्रेसशिवाय अपूर्ण असल्याचे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काही प्रयत्न करीत असतील तर त्याचे दृश्य परिणाम लवकरच पाहायला मिळतील, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱयांची बैठक खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रशांत किशोर हे राजकीय नेते नाहीत. त्यांनी आमच्यासाठी, काँग्रेससाठी काम केले आहे. ते व्यावसायिक राजनीतीकार आहेत. जर कोणी प्रमुख नेते त्यांना भेटले असतील तर त्यांच्या पक्षाच्या विस्तारासाठी भेटले असावेत, असे संजय राऊत म्हणाले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याच्या मुद्दय़ावर प्रश्न विचारला असता, डी. बी. पाटील कष्टकऱयांचे नेते होते. डी. बी. पाटील यांचे बाळासाहेबांशी चांगले संबंध होते. त्यांनी शेवटची निवडणूक शिवसेनेतूनच लढवली. डी. बी. पाटील जिवंत असते तर त्यांनी बाळासाहेबांच्याच नावाला पसंती दिली असती. बाळासाहेब हे लोकनेते होते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे नाव होते. त्यामुळे या विमानतळाला बाळासाहेबांचेच नाव योग्य असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दय़ाबाबत पत्रकारांनी विचारले असता खासदार राऊत म्हणाले की, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेत त्यांना साकडे घातले आहे व सर्वांचीच हा प्रश्न लवकर सुटावा यासाठी धडपड सुरू आहे.

































































