
रुग्णसंख्या घटलेल्या जिह्यांत टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली असली तरी मुंबईची लाइफलाइन लोकल अद्याप सर्वसामान्यांसाठी बंदच आहे. मात्र मुंबईत सर्वांसाठी लोकलचा निर्णय घेण्यासाठी 17 जून रोजी ‘एमएमआर’ रिजनमधील रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. या आढाव्यानंतर राज्य सरकारकडे याबाबत चर्चा केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
राज्यात 7 जूनपासून कोरोना निर्बंध शिथिल करताना पाच स्तर तयार करून सूट देण्यात आली आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 5.25 वरून 4.40 टक्के झाल्याने सध्या मुंबईचा समावेश दुसऱया स्तरात झाला आहे. मात्र नियम तिसऱया स्तरातीलच लागू आहेत. त्यामुळे पालिका सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासाठी कोरोना स्थितीचा अंदाज घेत आहे. मुंबईत नोकरीनिमित्त व इतर कारणासाठी मुंबईसह मुंबईशेजारील शहरांमधील येणाऱया लोकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे लोकल सुरू करताना फक्त मुंबईच नाही, तर संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील कोरोना स्थितीचा विचार करावा लागणार आहे. त्यानुसार येत्या गुरुवारी एमएमआर क्षेत्रातील मुंबईसह शेजारच्या ठाणे, नवी मुंबई विभागातील कोरोना रुग्णांचा आढावा घेतला जाणार आहे. पॉझिटिव्हिटी रेट व इतर स्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.


























































