पुणे शहरातील हिंगणे खुर्द, बिबेववाडीत नागरिकांची लूटमार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील विविध भागांत राहणाऱ्या नागरिकांची लूटमार होण्याचे सत्र कायम आहे. येथील चोरट्यांनी हिंगणे खुर्द, बिबवेवाडी परिसरात चोरी केल्याच्या मोठ्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगणे खुर्दमधील महादेव नगर परिसरात पार्टीसाठी पैसे पाहिजेत म्हणून तरुणाच्या गळ्याला कोयता लावून खिशातील पैसे काढून घेतले आहेत. याप्रकरणी सागर ढेबे (रा. साईनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा छगन मरगळे (19, रा. साईनगर) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महादेवनगर येथील एका स्वीट मार्टसमोर 13 जून रोजी दुपारी कृष्णा मित्रासोबत थांबला होता. त्यावेळी आरोपी सागर त्या ठिकाणी आला. ‘मला पार्टीला पानशेत येथे जायचे आहे, तुझ्याकडील सर्व पैसे दे, नाहीतर तुला मारून टाकीन, अशी धमकी देत कोयता गळ्याला लावला. त्यावेळी कृष्णा याने माझ्याकडे पैसे नाहीत’, असे सांगितले. त्यावेळी आरोपीने दमबाजी करत तुला माहिती नाही, मी वडगावचा भाई आहे, असे म्हणत कोयता दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

कृष्णाच्या खिशातील 2 हजार 100 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस तपास करत आहेत. त्याशिवाय बिबवेवाडीतील यश लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकाला दुचाकीस्वार चोरट्यांनी अडवून दमदाटी करत त्यांच्याजवळील मोबाईल आणि जेवणाचा डबा हिसकावून घेतला. अविनाश निवृत्ती मोरडे (57, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.