नगर जिल्हय़ात ऑनलाइन शाळेत 30 टक्के उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन शैक्षणिक वर्षाला मंगळवारपासून (दि. 15) सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाविनाच वर्ग भरले. ऑनलाइनमुळे शिक्षक शाळेत आणि विद्यार्थी घरी असे चित्र होते. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची सरासरी 25 ते 30 टक्के ऑनलाइन उपस्थिती असल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या दुसऱया लाटेचा कहर कमी झाल्याने नगर जिल्हा 7 जूनपासून अनलॉक झाला. राज्याच्या शिक्षण विभागाने दि. 15 जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिक्षकांची पहिली ते नववी व अकरावी पन्नास टक्के, दहावी आणि बारावी शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.

जिल्ह्यात प्राथमिक विभागाच्या 3 हजार 337, तर माध्यमिकच्या 1 हजार 7 शाळा आहेत. या सर्व शाळा पहिल्याच दिवशी सुरू झाल्याचे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.

प्राचार्य, प्रगत महाविद्यालय प्राथमिकच्या सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन केले असून, शाळा व परिसराची स्वच्छता झाली आहे. पाठय़पुस्तक महामंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदविली आहे. मात्र, अजून शिक्षण विभागाला पाठय़पुस्तके प्राप्त झालेली नाहीत.
– शिवाजी शिंदे शिक्षणाधिकारी, प्राथमिक