आगळं वेगळं – ‘थेरमिन’ व त्याचा जनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल कोकाटे

थेरमिन हे एक इलेक्ट्रॉनिक संगीत वाद्य आहे जे प्रत्यक्ष हात न लावता वाजवता येतं. हे बनवणाऱ्या माणसाच्या, लिओ थेरमिन, नावावरून या वाद्याचं नाव ठरवलं गेलं.

इंजिनीयर लेव सर्गेयविच तेर्मेन, जो नंतर लिओ थेरेमिन म्हणून प्रसिद्ध झाला, याने एक साधन नावाला म्हणून 1920 मध्ये बनवलं. नंतर त्याने ते एक विशेष सांगीतिक साधन म्हणून विकसित केलं. 1928 मध्ये ते पूर्णपणे तयार झालं. मग तर त्याने जे काही केलं त्यामुळे सारं जग अचंबित झालं. कारण तो जे काही करत होता ती त्यांना एक जादू वाटत होती. रेडिओसारख्या दिसणाऱया आणि दोन अँटेना असणाऱया या वाद्यासमोर उभं राहून तो फक्त त्याचे हात वेगवेगळ्या तऱहेने हलवत होता आणि त्यातून जादुई आवाज येत होते.

थेरमिन हे एक इलेक्ट्रॉनिक संगीत वाद्य आहे जे प्रत्यक्ष हात न लावता वाजवता येतं. हे बनवणाऱया माणसाच्या, लिओ थेरमिन, नावावरून या वाद्याचं नाव ठरवलं गेलं. 1928 मध्ये थेरमिनने त्याचं पेटंट घेतलं. दोन अँटेनांच्या मध्ये विद्युत चुंबकीय लहरी निर्माण करून संगीत निर्माण केलं जातं. डाव्या बाजूच्या आडव्या गोल वळणाऱया अँटेनाने व्हॉल्यूम नियंत्रित केला जातो आणि उजव्या बाजूच्या उभ्या अँटेनाने वेगवेगळे स्वर काढले जातात. दोन्ही हात आणि त्यांची बोटं हळुवार हलवत यातून गाण्याचे सूर निर्माण केले जातात.

थेरमिन वाजवायला शिकणं कठीण काम आहे. यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि कौशल्य मिळवण्यासाठी किमान दहा हजार तासांची प्रॅक्टिस करावी लागते. आज शंभर वर्षांनीदेखील हे असामान्य वाद्य ऐकणाऱयांना अत्यंत विस्मयकारक आणि प्रेरणादायक वाटतं. भौतिक शास्त्र्ाातील इंजिनीयर लिओ थेरमिन याने हे वाद्य बनवल्यावर जेव्हा रशियाचे प्रथम राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर लेनिन यांना दाखवलं तेव्हा ते एवढे प्रभावित झाले की, त्यांनी थेरमिन यांना तशी 600 वाद्ये बनवायला सांगितली. शिवाय त्याच्या प्रसारासाठी बाहेर देशांतही पाठवलं… युरोप, चीन, जपान, अमेरीका… थेरमिन अमेरिकेत 6 महिनेच राहणार होते, पण त्यांचं राहाणं इतकं लांबलं की ते तिथे 11 वर्षे राहिले.

आता या वाद्याला 100 वर्षे झाली तरी ते जास्त लोकांपर्यंत पोचलेलं दिसत नाही, कारण ते वाजवणं अत्यंत कठीण आहे आणि त्याचा म्हणावा तसा प्रसार झाला नाही. याचा आवाज मात्र मानवी आवाजाच्या खूपसा जवळ जातो. थेरमिन वाजवणाऱयाच्या 6 फुटांच्या अंतरात कुणीही वा काहीही हललं तर त्याच्या स्वरांमध्ये आणि त्यांच्या फेकीत फरक पडतो आणि हा फरक पडणं वादकाला आवडण्यासारखं नसतं.

या वाद्याचं दिसणं आणि त्याचा आवाज बऱयाचदा गूढ आणि अगम्य वाटतो. त्यामुळे हे वाद्य मिकलोस रोझसाच्या ‘स्पेलबाऊंड’ आणि ‘द लॉस्ट वीक एण्ड’, बर्नार्ड हेरमन याच्या ‘द डे द अर्थ स्टुड स्टिल’ आणि जस्टिन हरविट्झ याच्या ‘फर्स्ट मॅन’, टेलिव्हिजन शोजच्या थीम गाण्यात आणि ‘मिडसमर मर्डर’ या टीव्ही नाटकाच्या संगीतात वापरलं गेलं आहे. शिवाय कॉन्सर्ट संगीत आणि रॉक संगीतातही थेरमिन वाद्य वापरलं आहे.

मग जेव्हा इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा जमाना आला तेव्हा थेरमिनबाबतची आवड कमी झाली. तरी काही एका खास वर्गासाठी ती टिकून राहिली. विशेषतः त्याचं किट घेऊन ते बनविणाऱयांमध्ये. त्यासाठी रॉबर्ट मूगचा हातभार होता. तो शाळेत असल्यापासून (1950 च्या दशकापासून) थेरमिन कसं बनवावं यावर बरेच लेख लिहिले आणि त्यासाठीचे किटही बनवून विकले. नंतर त्या सगळ्या अनुभवातून त्याने सिंथेसायझर बनवला. त्यानंतर रेमंड स्कॉटने थेरमिनपासून प्रेरणा घेऊन की-बोर्ड थेरमिन बनवलं – क्लॅविवॉक्स!

1993 मध्ये ‘थेरमिन ः ऍन इलेक्ट्रॉनिक ओडिसी’ हा सिनेमा आल्यानंतर या वाद्याबद्दलची उत्सुकता परत जागृत झाली. जरी थेरमिनसारखा आवाज सिंथेसायझरवर काढता येत होता तरी संगीत दर्दींना थेरमिनचं विशेषत्व, त्याची अभिव्यक्ती आणि त्याचा खास आवाज आवडू लागला. नंतर हे वाद्य संगीत सिनेमे, टेलिव्हिजन, व्हिडीओ गेम्स, विशेष गाणी या सगळ्या ठिकाणी ऐकू येऊ लागलं. थेरमिन साहजिकच खूश होता. अशी लोकप्रियता मिळत असतानाच 3 नोव्हेंबर 1993 मध्ये मॉस्को येथे त्याने अखेरचा श्वास घेतला.

– [email protected]