एका तरुणाला व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवणं अंगाशी आलं आहे. व्हॉट्सअॅपवर कोयत्याचे स्टेटस ठेवणाऱ्या या तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. अनिकेत साठे (रा. आंबेडकरनगर, चंदननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदननगर परिसरात राहणारा अनिकेत साठे हातामध्ये शस्त्र घेऊन उभा असल्याचे व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत असतो. तो चंदननगर येथील पाण्याच्या टाकीजवळ थांबला आहे. त्याच्याकडे शस्त्र आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे हवालदार दीपक भुजबळ यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने सापळा रचून साठे याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे कोयता आढळून आला. त्याला अटक करून चंदननगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.



























































