कहानी ‘किस’ किसकी; एका चुंबनाने गमावले मंत्रीपद, वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक हे सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. मॅट यांनी आपल्या महिला सहकाऱ्याला मिठी मारून चुंबन घेऊन कोविड -19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले होते. या घटनेनंतर झालेल्या गदारोळानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

या घटनेपासून मॅट यांची सहकारी जिना कोलाडैंगलोही बरीच चर्चेत आली आहे. जिना अब्जावधी मालमत्तांची मालक आहे. 43 वर्षीय जिना या एक बिजनेस वुमन असून त्या ब्रिटनच्या आरोग्य विभाग सल्लागार आहेत. याशिवाय ऑलिव्हर बोनास नावाच्या कंपनीची कम्युनिकेशन डायरेक्टर म्हणूनही त्या काम पाहतात.

आपल्या महिला सहकाऱ्याचे चुंबन घेत असताना मॅट यांचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा वाद उघडकीस आल्यानंतर ब्रिटनचे बोरिस जॉन्सन सरकार बॅकफूटवर आले होते. वाद वाढल्यानंतर मॅट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून पंतप्रधान बोरिस जॉन्सन तो स्वीकारलेला आहे.

मॅट हँकॉक यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलं आहे की, ‘आपण कोरोना संकटाला लढा देण्यासाठी एक देश म्हणून खूप मेहनत घेतली आहे. ‘ दरम्यान, हँकॉक यांनी हा वाद समोर आल्यानंतर राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यांनी माफीही मागितली होती. मात्र वाद अधिकच वाढल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.