
पुण्यात मित्रासोबत बसलेल्या एका तरूणावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात तरूण गंभीररित्या जखमी झाला आहे. संतोष खेडकर असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संतोष गायकवाड यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष खेडकर आणि संतोष गायकवाड मित्र असून दोन दिवसांपुर्वी रात्री सव्वा अकराच्या सुमारास हडपसरमधील रायकवर वस्तीवर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या पाच ते सहाजणांच्या टोळक्यातील एकाने संतोष गायकवाड यांना प्रकाश गायकवाड उर्फ गोट्या याचा मित्र असल्याचे सांगितले. त्यावेळी संतोषला गोट्या आपला मित्र असल्याचे सांगितले. त्यावेळी टोळक्याने त्यांना फोन लावण्यास सांगितले. मात्र, आरोपींच्या हातातील कोयते पाहून संतोषने पळ काढला. त्यावेळी त्याठिकाणी संतोष खेडकर आरोपींच्या तावडीत सापडला. आरोपींनी त्याच्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विकास राउत यांनी दिली आहे.



























































