
देशात ट्विटरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. थर्ड पार्टी कंटेंटला केंद्र सरकारकडून मिळणारे कायदेशीर संरक्षण मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरने नुकतेच गमावले आहे. त्यामुळे ट्विटरवर काही आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यास सदर मजकूर पोस्ट करणारा आणि ट्विटर असे दोघांनाही जबाबदार धरले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत ट्विटरविरोधात चार गुन्हे दाखल झाले असून हिंदूंच्या कालीदेवीबाबत वादग्रस्त मजकूर पोस्ट झाल्याने आज दिल्लीत एका वकिलाने दिलेल्या तक्रारीनुसार ट्विटरविरोधात पाचवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘एथिस्ट रिपब्लिक’ने आपल्या ट्विटर हँडलवर कालीदेवीचे छायाचित्र असलेल्या टीशर्टचा फोटो पोस्ट केला आहे. सदरची पोस्ट वादग्रस्त असून लोकांच्या भावना दुखावणारी असल्याचा दावा करत वकिलाने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी ट्विटरचे एमडी मनीष माहेश्वरी आणि ‘रिपब्लिक एथिस्ट’वर गुन्हा दाखल केला आहे.
याआधी मुस्लीम वृद्धाला मारहाण होत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केल्याने गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरवर पहिला गुन्हा नोंदवला आहे. ट्विटरवर हिंदुस्थानचा चुकीचा झेंडा दाखवल्याने बुलंद शहरात दुसरा, तर मध्य प्रदेशमध्ये तिसरा गुन्हा नोंदवला आहे. चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी याआधीच ट्विटरवर चौथा गुन्हा नोंदवलेला आहे. दरम्यान, 25 मेपासून हिंदुस्थानात नवे आयटी नियम लागू झाले आहेत. त्याचे पालन करणे प्रत्येक डिजिटल पंपनीला बंधनकारक आहे. मात्र ट्विटर त्याचे पालन करत नसल्याने त्यांनी कायदेशीर संरक्षण गमावले आहे.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक केल्यापासून तक्रारी वाढल्या
अमेरिकन कॉपीराईट कायद्याचा हवाला देत ट्विटरने 25 जून रोजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक केले होते. त्यानंतर ट्विटरने प्रसाद यांना कॉपीराईटच्या उल्लंघनाबाबत समज देत अकाऊंट पुन्हा सुरू केले होते. तेव्हापासून ट्विटरविरोधात तक्रारी वाढल्या आहेत.




























































