आज्ञा असेल तितका काळ आम्ही विरोधी पक्षात बसू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे दावे भाजप नेत्यांकडून सातत्याने केले जात आहेत. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितका काळ विरोधी पक्षात बसायची आज्ञा असेल तितका काळ आम्ही विरोधी पक्षात बसू, असे सांगत सरकार पाडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

पुणे दौऱयावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने पंकजा मुंडे या नाराज असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता ते म्हणाले, भागवत कराड यांना मंत्री केल्याने जेवढा आनंद मला किंवा पक्षातल्या कार्यकर्त्यांना झाला आहे त्याच्यापेक्षा जास्त आनंद पंकजाताईंना झाला असेल. कारण भागवत कराड हे मुंडे परिवारातले आहेत.

मी आणि डॉ. भागवत कराड आम्ही दोघेही मुंडे साहेबांनी तयार केलेले नेतृत्व आहे. याला पद दिल्याने, याला मंत्री केल्याने याला संपवायचेय वगैरे भाजपमध्ये नसते, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मतपरिवर्तन करून येणाऱयांना पक्षात घेतो

संपूर्ण देशात कलम 370 वर काँग्रेस सोडणारे सर्वात पहिले नेते कृपाशंकर सिंह हे होते. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना 20 महिन्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. कोणी मतपरिवर्तन करून पक्षात येत असेल तर आम्ही त्यांना घेतो. एखाद्या पक्षातून दुसऱया पक्षात गेलेला कधीतरी त्या पक्षाबद्दल वाईट बोललेला असतोच, असे सांगत फडणवीस यांनी कृपाशंकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचे समर्थन केले.