वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे कोल्हापूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मंजिरी भालेराव

महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला असलेल्या कोल्हापूर नगरीजवळच्या अनेक लहान लहान गावांत बरेच पुरातत्त्वीय अवशेष विखुरलेले आहेत. राष्ट्रकूट, शिलाहार या राजवंशाच्या काळात भरभराटीला आलेले हे स्थान अजूनही भक्ती आणि शक्ती याच्या परमोच्च शिखरावर विराजमान झालेले आहे. दोन हजार वर्षांपूर्वी जशी या स्थानाची समृद्धी होती तशीच ती आजही आहे.

कोल्हापूर शहरातील ब्रह्मपुरी हा प्राचीन वस्तीचे अवशेष असलेला भाग. शहराच्या पश्चिम भागात पंचगंगा नदीच्या उजव्या तीरावर आहे. तिथे वरचेवर प्राचीन अवशेष सापडत होते म्हणून 1944मध्ये व नंतर बरेच वेळा तिथे उत्खनन झाले. सुरुवातीच्या उत्खननातच अतिशय मोठय़ा प्रमाणावर ब्राँझच्या 102 वस्तू मिळाल्या. आजपर्यंत हिंदुस्थानी उपखंडात मिळालेल्या ब्राँझ-निधींपैकी हा सर्वात मोठा ब्राँझनिधी होता. या वस्तूंपैकी बऱयाच वस्तू आज गहाळ झाल्या आहेत. पण त्यातल्या काही आणि ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या कोल्हापूरच्या शासकीय संग्रहालयात ठेवल्या आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची मूर्ती म्हणजे ग्रीक समुद्रदेव पोसिडॉन याची 12.8 से.मी.ची छोटीशी प्रतिमा. परदेशी व्यापारी समुद्रमार्गाने व्यापारासाठी हिंदुस्थानात येत असत. त्यावेळेस आपला प्रवास सुरक्षित रीतीने व्हावा म्हणून कोणा रोमन व्यापाऱयाने त्याच्याबरोबर समुद्रदेवतेची मूर्ती आणली असावी. नंतर ती घरात ठेऊन तो त्याची पूजा करत असावा असे वाटते. याशिवाय झ्यूस या देवाचा मुलगा पर्सिअस आणि त्याची पत्नी अंद्रोमिडा यांच्या प्रतिमा असलेली 8.2 से.मी. व्यास असलेली एक ब्राँझची थाळीही या संग्रहात मिळाली. या ब्राँझनिधीमध्ये हिंदुस्थानी बनावटीच्या वाटतील असेही काही ब्राँझ पुतळे, ब्राँझची भांडी, खेळण्यातली वाटेल अशी एक बैलगाडी, आरसे, इ. मिळाले होते. तज्ञांच्या मते या सर्व वस्तू साधारणपणे इ.स. पूर्व 1ले शतक ते इ.स.चे 1ले – 2रे शतक या काळातील असाव्यात.

नंतर सांकलिया व दीक्षित यांनी केलेल्या उत्खननांत तर हिंदुस्थानी घरांपेक्षाही वेगळी रचना असलेली घरे उजेडात आली. या घरांमध्ये सांडपाण्याची व्यवस्था केलेली होती. स्वयंपाकघरात समोरासमोर चुली होत्या, पाण्याचा रांजण जमिनीत पुरलेला होता. रोममधून हिंदुस्थानात आयात झालेली मातीची भांडी, हिंदुस्थानी राजांची नाणी, रोमन राजांच्या नाण्यांच्या प्रतिकृती (पुतळ्या), रोमन मद्याकुंभांचे अवशेष अशा अनेक वस्तू सापडल्या. यावरून असे लक्षात येते की, कोल्हापूर तत्कालीन आंतरराष्ट्रीय व्यापारात एक महत्त्वाचे केंद्र होते. कोळपून हे एक महत्त्वाचे असे समृद्ध नगर होते. परदेशी लोकांचे इथे जाणेयेणेच नव्हे तर वास्तव्यही होते. त्याचाच परिणाम म्हणून परदेशी बनावटीच्या अनेक वस्तू या उत्खननात वरचेवर सापडत होत्या. कोल्हापूर शहराच्या महानतेचे विश्वसनीय उल्लेख कोणत्याही तत्कालीन लिखित साधनांमध्ये सापडत नसले तरी उत्खननातून मिळालेले भौतिक पुरावे या शहराच्या वैविध्यपूर्ण वैभवाची साक्ष देतात.

कोल्हापूर परिसरातील पुरातत्त्वीय अवशेष

कोल्हापूर परिसर जरी शक्तिस्थळ म्हणून प्रसिद्ध असले तरी साधारणपणे 6व्या शतकात या परिसरात शैवपंथाचे प्राबल्य दिसून येते. याचे एक उदाहरण म्हणून कोल्हापूर ते गगनबावडा या रस्त्यावरील पळसांबे येथील एकपाषाणी मंदिरे. मोठय़ा दगडांमध्ये कोरलेली तीन मंदिरे तसेच एक मोठे लेणे या ठिकाणी आहे. द्राविड मंदिर स्थापत्याचा प्रभाव असलेली ही मंदिरे एका दगडात कोरून काढली आहेत. आतमध्ये शिवलिंग आहेत. तज्ञांच्या मते ही स्मारक किंवा स्मृती मंदिरे असू शकतात.

कोल्हापूरच्या भोवतीच्या परिसरात असलेल्या महत्त्वाच्या स्थापत्य अवशेषांमध्ये पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे जाताना लागणाऱया पांडवदरा नावाच्या आणि त्यांचा धार्मिक संबंध सांगता येणार नाही अशी लेणी आहेत. याचप्रमाणे माळेश्वर किंवा माळवाडी नावाच्या शैव आणि ऐनारी नावाच्या अपूर्ण लेणीही कोल्हापूरपासून फार लांब नाहीत.

महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला असलेल्या या नगरीजवळच्या अनेक लहान लहान गावांत बरेच पुरातत्त्वीय अवशेष विखुरलेले आहेत. त्यापैकी काहींवर स्थानिक अभ्यासकांनी संशोधन केले आहे. पण अजूनही अनेक स्थळे संशोधकांची वाट पाहत आहेत. अशाच काही महत्त्वाच्या पुरातत्त्वीय स्थळांचा डॉ. आनंद दामले यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या भारतीयविद्या (इंडोलोजी) पारंगत या अभ्यासक्रमातील संशोधन प्रकल्प या विषयासाठी अभ्यास केला. कोल्हापूरचे रहिवाशी उमाकांत राणींगा, शिरूर येथील प्रा. डॉ. पद्माकर प्रभुणे, धारवाडचे प्रसिद्ध पुराभिलेखतज्ञ कै. डॉ. श्रीनिवास रित्ती यांनीही त्यांना यात वेळोवेळी मदत केली. या संशोधनातून कसबा बीड या छोटय़ाशा गावातील अपरिचित असे अवशेष अभ्यासले गेले. या गावात एक कल्लेश्वर नावाचे प्राचीन मंदिर, 200पेक्षा जास्त वीरगळ आणि अचानक रस्त्यावर किंवा शेतात सापडणारी शिलाहारकालीन सोन्याची नाणी या सर्वांचा सखोल अभ्यास डॉ. आनंद दामले यांनी केला. या परिसरात आरे, असळज, बहिरेश्वर, सांगशी अशा अनेक प्राचीन स्थळांचा परामर्श या प्रकल्पात घेतला आहे. आरे येथील वीरगळ तसेच सांगशी येथील शिल्पयुक्त शिळा यांच्यावर असणारे शिलालेख दक्षिण महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात भर घालणारे आहेत. सांगशी येथील शिळेवरचे शिल्प आणि लेख एकमेवाद्वितीय आहेत.

या लहानशा गावात ही शिळा अनेक वर्षे पडून होती; पण आता तिच्यावर एक छोटेसे मंदिर बांधले आहे. या शिळेवर चितेच्या अग्नीमध्ये झोपलेल्या एका स्त्राrचे शिल्प आहे. त्याचबरोबर एक ब्राह्मी लिपी आणि संस्कृत भाषेत लिहिलेला त्रुटीत शिलालेख आहे. त्यामधले राजाचे नाव गेले आहे पण त्या स्त्राrचे नाव ‘हालीदेवी’ असे होते हे कळते. ही राणी लहान वयात गेल्यामुळे तिच्या स्मरणार्थ चैत्यक (स्मारक) निर्माण केले असे या लेखात म्हटले आहे. अशा प्रकारचे एक स्मारक आणि तेही एका राणीसाठी केलेले असणे हे हिंदुस्थानी इतिहासात फारसे बाघायला मिळत नाही.

कोल्हापूरची धार्मिक विविधता

कोल्हापूर म्हटले की अंबाबाई हे नाव अपोआप तोंडात येते एवढे कोल्हापूरचे आणि अंबाबाई किंवा महालक्ष्मी या देवेतेचे एकरूपत्व आहे. पण फक्त बौद्ध, शैव किंवा शाक्त याच सम्प्रदायांसाठी कोल्हापूर महत्त्वाचे होते असे नाही तर जैन धर्मियांसाठीसुद्धा कोल्हापूर हे एक तीर्थक्षेत्र आहे. इथे आणि परिसरात अनेक जैन मंदिरे आहेत. चंदगड येथील जैन मंदिरे, जिह्यातील इतर जैन मंदिरे आणि मठ हे या धर्माच्या प्रसाराचे पुरावे आहेत. इथे मुख्यतः दिगंबर जैन लोकांची वस्ती होती असे दिसते. शिलाहारांच्या काळात त्यांच्या अनेक राजांनी जैन धर्माला आश्रय दिलेला होता, त्यासंबंधीचे लेखसुद्धा त्या मंदिरांमध्ये पाहायला मिळतात. याशिवाय लिंगायत, इस्लामी, ख्रिस्ती धर्मीयांची धार्मिक स्थळे या ठिकाणी पाहायला मिळतात त्यावरून या धर्मियांचे इथले वास्तव्य किती जुने आणि महत्त्वाचे होते हे लक्षात येते. कणेरमठ या ठिकाणी असलेली लिंगायत मंदिरे या दृष्टीने उल्लेखनीय आहेत.

पण तरीही आज मात्र कोल्हापूर म्हटले की महालक्ष्मी हे समीकरण आहे. राष्ट्रकूट, शिलाहार या राजवंशाच्या काळात भरभराटीला आलेले हे स्थान अजूनही भक्ती आणि शक्ती याच्या परमोच्च शिखरावर विराजमान झालेले आहे यात काही शंका नाही. दोन हजार वर्षांपूर्वी जशी या स्थानाची समृद्धी होती तशीच ती आजही आहे. या नगरीच्या व्यक्तिमत्त्वात जे वैविध्य तेव्हा होते तसेच ते आजही दिसते.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)
[email protected]