
>> देवेंद्र भगत
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेले आणि स्वातंत्र्यलढय़ाच्या रणनितीचे साक्षीदार असलेले मणिभवन आणि ऑगस्ट क्रांती मैदान आणि ऐतिहासिक वस्तूंचा ‘हेरिटेज वॉक’ मुंबईकर-पर्यटकांना लवकरच मिळणार आहे. ग्रॅण्ट रोडच्या पंडिता रमाबाई रोड येथून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत हा हेरिटेज वॉक असेल. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी पालिका ‘हेरिटेज लूक’ असलेला एक किमीचा फुटपाथही तयार करणार आहे. ‘डी’ वॉर्डचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी ही माहिती दिली.
पालिकेच्या माध्यमातून मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवून लौकिक वाढवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये मजबूत रस्ते, आकर्षक फुटपाथ, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. याशिवाय देशी-विदेशी पर्यटकांसाठी हेरिटेज वास्तूंच्या ‘पर्यटन सहल’ घडवण्याचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे. फोर्ट येथील हेरिटेज पालिका मुख्यालयातही ‘हेरिटेज वॉक’ सुरू करण्यात आला आहे. याच धर्तीवर ‘डी’ वॉर्डमध्ये ‘हेरिटेज वॉक’ लवकरच सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, मणिभवनासह ऐतिहासिक वास्तू असलेल्या या परिसरातील रस्त्यांची सध्या दुरवस्था झाली आहे. या ठिकाणच्या मोकळ्या जागांचा वापर बेकायदेशीररीत्या पार्पिंगसाठी केला जात आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून सौंदर्यीकरण आणि सुधारणा करून राबविण्यात येणारा उपक्रम मुंबईच्या पर्यटनात भर टाकणार ठरणार आहे.
या वास्तू पाहता येणार
- महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेले मणिभवन.
- मुंबईतील पहिली मुलींची शाळा ‘सेंट कोलंबा स्कूल.’
- पंडिता रमाबाई हॉस्टेल.
- मुलींचे पहिले आर्य महिला समाज हॉस्टेल.
- स्वातंत्र्यलढय़ाचे साक्षीदार ऑगस्ट क्रांती मैदान.
असा असणार मार्ग, स्वरूप.
पंडिता रमाबाई रोडपासून सुरू होणारा फुटपाथ सिमेंट-काँक्रीटने बनवण्यात येईल, मात्र फुटपाथला हेरिटेज पुरातन दगडांप्रमाणे स्वरूप देण्यात येईल. फुटपाथच्या दोन्ही बाजूला सुशोभिकरण, दिव्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. फुटपाथची लांबी 1 किमी तर रुंदी आवश्यतेनुसार 2 ते 3.5 मीटर असेल. या कामासाठी पालिका सुमारे दोन कोटींचा खर्च करणार आहे.

























































