
सध्याची कोरोनाची स्थिती, ऑनलाइन शिक्षणातील अडथळे लक्षात घेता पेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी विशेष मूल्यमापन पद्धती जाहीर केली आहे. सीबीएसईने पूर्ण वर्षाची दोन सत्रांत विभागणी केली असून दोन्ही सत्रांत प्रत्येकी 50 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार आहे. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर दुसऱया सत्राची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी कमी केलेल्या अभ्यासक्रमाची माहिती शाळांना जुलै अखेरपर्यंत देण्यात येईल, असेही सीबीएसईच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. बोर्डाने स्पष्ट केले की, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रोजेक्ट वर्कसाठी सीबीएसई बोर्ड तयारी करीत आहे. सर्व विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी लवकरच मार्गदर्शन सूचना जारी करण्यात येईल, असेही सीबीएसईच्या वतीने सांगण्यात आले आहे.
असा असेल पेपर पॅटर्न
- पहिल्या सत्रातील परीक्षा पर्यायी प्रश्नपद्धतीनुसार होईल. ज्यात केस बेस्ड वैकल्पिक प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे असेल. ही परीक्षा केवळ पहिल्या 50 टक्के अभ्यासक्रमावर आधारित असेल.
- दुसऱया सत्राची परीक्षा दोन तासांची असेल. यात विविध प्रश्न विचारले जातील. (थोडक्यात, दीर्घेत्तरी, लघुत्तरी प्रश्न) कोरोनाची परिस्थिती सामान्य न झाल्यास परीक्षा प्रथम सत्राप्रमाणे 90 मिनिटांची असेल. यात फक्त पर्यायी प्रश्न विचारले जातील.
- प्रत्येकी 50 टक्के अभ्यासक्रम; वैकल्पिक, प्रश्नपत्रिका स्वरूपात पेपर
- नोव्हेंबर–डिसेंबरमध्ये पहिल्या तर मार्च–एप्रिलमध्ये दुसऱया सत्राची परीक्षा


























































