लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भिगवणमध्ये मुख्य बाजारपेठेतील रस्त्यात अडवून धमकी देत लूटमार करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नवनाथ बबन शिंदे (30, रा. लोणी काळभोर) व लखन रमेश झेंडे (25, रा. दौंड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनराज महंमद अन्सारी हे बेकरी व्यावसायिक माल घेऊन चालले होते. भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद हॉटेलजवळ आरोपींनी आपली दुचाकी त्यांच्या गाडीसमोर आडवी घातली. त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करत ‘तुझा मोबाईल आणि तुझ्याकडील पैसे दे. नाहीतर तुला सोडणार नाही’ , असे म्हणून अन्सारी यांचा मोबाईल घेऊन पळून गेले.

सदरच्या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना फक्त गाडी आणि आरोपी यांच्या वर्णनावरून माहिती गोळा करण्यात आली. पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत लाल रंगाच्या दुचाकीवरून दोघे आरोपी थेऊर फाटा येथे एका हॉटेलजवळ थांबल्याचे कळले. यावरून त्या ठिकाणी जाऊन ही गाडी वापरत असलेल्या नवनाथ शिंदे व लखन झेंडे या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, मारामारी, बलात्कार असे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींकडून मोबाईल आणि स्कुटी, असा एकूण 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या दोघांना मुद्देमालासह पुढील तपासासाठी भिगवण पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सुत्रे वेगात फिरवून या गुन्ह्याचा कोणताही पुरावा नसताना फक्त गाडी आणि आरोपी यांच्या वर्णनावरून माहिती गोळा करून त्या दोन्ही आरोपींना चोवीस तासांच्या आत ताब्यात घेतले.

ही कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलील अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, विजय कांचन, प्रमोद शिंदे, पो कॉ. धीरज जाधव यांच्या पथकाने केली.