
मुंबईत कोरोना पूर्ण आटोक्यात आला असला तरी मुंबईबाहेरून येणाऱया 40 लाखांवर रेल्वे प्रवाशांमुळे कोरोना पुन्हा वाढण्याची धास्ती असल्याने ‘तूर्तास सर्वांसाठी लोकल नको!’ अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे. पालिकेने राज्य शासनाकडे मुंबईतील कोरोना स्थितीचा ‘रिपोर्ट’ सादर केला आहे. यानुसार मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 928 दिवसांवर गेला असून दररोज 30 हजारांवर चाचण्या होत असताना सरासरी रुग्णवाढ 0.07 टक्क्यांपर्यंत खाली आली असून गेल्या अनेक दिवसांपासून मृत्युदरही एक टक्क्यापेक्षा कमी राहिला आहे. मात्र दररोजचे एकूण 75 ते 80 लाख प्रवासी असलेली लोकल सर्वांसाठी सरसकट सुरू केल्यास गर्दी वाढून कोरोना वाढण्याची भीती असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यावर आलेली कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आली आहे. राज्य सरकारने 6 जूनपासून ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरू केल्याच्या महिन्याभरानंतरही मुंबईतील स्थिती नियंत्रणात राहिली आहे. असे असले तरी ऑगस्टमध्ये संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका आरोग्य तज्ञांनी व्यक्त केल्यामुळे आणि सर्वांसाठी लोकल सुरू केल्यास वाढणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारसह पालिकेनेही सावध पवित्रा घेत टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने निश्चित केलेल्या ‘आराखडय़ा’नुसार चाचण्यांच्या प्रमाणात 5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड व्याप्तीचे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे मुंबईचा समावेश ‘पहिल्या स्तरात’ होत असताना, निर्बंध मात्र तिसऱया टप्प्यातील कायम ठेवण्यात आले आहेत.
सरसकट निर्बंध उठवल्यास धोका
शहरात मुंबईबाहेरून येणाऱया प्रवाशांसह नाशिकहून येणारे भाजीपाला विव्रेते; कोल्हापूर, पुणे, गुजरात, पालघर आदी भागातून येणारे दूध-भाजी विव्रेते-व्यावसायिकांच्या चाचण्या या गोष्टींचाही विचार करावा लागणार आहे. रेल्वे स्टेशनवर इतर राज्यांतून येणाऱया प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात असल्या तरी सर्व निर्बंध सरसकट उठवल्यास गर्दी वाढल्याने कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती आहे. त्यामुळे सरसकट निर्बंध उठवल्यास धोका असल्याने टप्प्याटप्प्यानेच निर्बंध शिथिल करणे योग्य असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मुंबईत सात हजार, तर ठाण्यात 16 हजार सक्रिय रुग्ण
मुंबईत सद्यस्थितीत सुमारे सात हजार सक्रिय रुग्ण आहेत. तर हाकेच्या अंतरावर असणाऱया ठाण्यात सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजार 100 इतकी आहे. तर रायगडमध्ये सक्रिय रुग्ण 4469 आहेत. मीरा भाईंदरमध्ये एकूण रुग्णांची संख्या 56 हजारांवर पोहोचली असून 1131 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नवी मुंबईत दररोज सुमारे 100 तर ठाणे, वसई-विरारमध्येही दररोज 50 जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. शिवाय मुंबईतील रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईबाहेरून या ठिकाणी उपचारासाठी आलेले आहेत.
मुंबई सद्यस्थिती
- एकूण कोरोनाबाधित 729250
- आतापर्यंत कोरोनामुक्त 704259
- एकूण चाचण्या 7628469
- एकूण मृत्यू 15654
- सध्या सक्रिय रुग्ण 6989
- लक्षणे नसलेले 3067
- अत्यवस्थ 657
- दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधातून सूट
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंध आणि रेल्वे प्रवासात सूट द्यावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरही पालिका प्रशासन विचार करीत असून राज्य सरकारसोबत पालिकेची येत्या दोन दिवसांत निर्णायक बैठक होणार आहे.
मुंबईत लसीकरणासाठी पात्र असलेल्या 90 लाख लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत सुमारे 48 लाख जणांनी पहिला डोस घेतला आहे, तर 13 लाख जणांनी दुसरा डोस घेतला आहे. मात्र पुरेसे डोस मिळत नसल्याने सद्यस्थितीत लसीकरणाला ब्रेक लागत असल्यामुळेही चिंता आहे.



























































