कोकणात कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी 3700 कोटींचे पॅकेज, विजय वडेट्टीवार यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणावर एकापाठोपाठ एक अशी नैसर्गिक संकटं येत आहेत.निसर्ग आणि तौक्ते वादळानंतर कोकणाला आता बसलेल्या अतिवृष्टीच्या फटक्याने अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांचे जीवही गेले आहेत.

भविष्यात हे टाळता यावे यासाठी राज्य सरकारने फार मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. खेड शहरातील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत खेड शहराला पुराचा वेढा पडला. खेडची बाजारपेठ अनेक तास पाण्याखाली राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उद्ध्वस्त झालेल्या खेड शहराची पाहणी करण्यासाठी राज्याचे मदत आणि पुनर्विकास मंत्री सध्या खेड दौऱ्यावर आहेत.

रविवारी सकाळी शहराची पाहणी केल्यावर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कोकणाला सध्या विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या चार वर्षात दोन वादळं आणि आता अतिवृष्टी यामुळे कोकणाची पुरती वाट लागली आहे.

कोकणावर वारंवार येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी कोकणात भुमिगत वीज केबल टाकणे गरजेचे आहे. पूर, वादळ अशी नैसर्गिक आपत्ती उद्भवते तेव्हा वीजयंत्रणा ठप्प होते. त्यामुळे मदतकार्यातही अडचणी निर्माण होतात. कोकणात वारंवार उद्भवणाऱ्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपायोजना करण्यात येणार असून यासाठी 3700 कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांच्यासोबत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम तसेच आमदार योगेश कदम उपस्थित होते.