
तज्ञ डॉक्टर्स, फिरती प्रयोगशाळा, पाण्याचे टँकर आणि शेकडो कर्मचाऱयांसह पालिका रायगड आणि कोल्हापूर पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेली आहे. पालिकेच्या दोन टीम आवश्यक साधनसामग्रीसह पूरग्रस्त भागात रवाना झाल्या आहेत. या टीम पूरग्रस्तांना स्वच्छतेसह सर्व प्रकारची मदत करणार आहेत. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आणि सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या टीम पूरग्रस्त भागात काम करणार आहेत.
मुंबई महापालिकेची एक टीम महाड येथे मदत कार्य करण्यास पोहोचली आहे. यामध्ये एक फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घन कचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे 75 कर्मचारी, पाण्याचे 4 टँकर, 1 टोइंग लॉरी इत्यादींचा समावेश आहे. याबाबत वैद्यकीयविषयक बाबींचे व्यवस्थापन हे पालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वेपचार शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी तर आपत्कालीन व्यवस्थापनविषयक कार्यवाही पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर करीत आहेत. यासाठी घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उप मुख्य अभियंता सुनील सरदार यांचीही मदत घेतली आहे.
असे करणार काम
- पालिकेने महाड-रायगड येथे पाठवलेल्या टीममध्ये 110 कर्मचाऱयांचा समावेश आहे. याशिवाय 4 बस, 3 डंपर, ट्रक, सुमो आणि दुरुस्ती वाहनांचा समावेश आहे.
- यामध्ये डॉक्टर्स, सुपरवायझरसह 75 सफाई कामगारांचा समावेश आहे. संबंधित कर्मचाऱयांच्या चमूसोबत ‘रिसायकल मशीन’ आणि इतर आवश्यक यंत्रसामग्रीदेखील पाठविण्यात आली आहे.
- पालिकेने 2019 मध्ये कोल्हापुरात निर्माण झालेल्या पूरस्थितीप्रसंगी अशाच प्रकारची मदत केली होती. त्यावेळीही मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या माध्यमातून नागरी सेवासुविधांसह पालिकेच्या कर्मचाऱयांनही अहोरात्र मेहनत घेत मदतकार्य केले होते.
































































