
रिओनंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून इतिहास रचणाऱया पी.व्ही. सिंधू या हिंदुस्थानच्या बॅडमिंटनपटूचे मायदेशात मंगळवारी ग्रॅण्ड वेलकम करण्यात आले. शटलक्वीन पी.व्ही. सिंधू टोकियो येथून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली तेव्हा तेथील कर्मचाऱयांनी टाळ्या वाजवून तिचे जंगी स्वागत केले. त्यानंतर हिंदुस्थानी बॅडमिंटन महासंघाचे अजय सिंघानिया व हिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी तिचे अभिनंदन केले. याप्रसंगी पी.व्ही. सिंधू हिच्यासोबत तिचे प्रशिक्षक पार्क संग हेदेखील होते.
आनंदाचा क्षण
मायदेशात झालेले जंगी स्वागत पाहून पी.व्ही. सिंधू भारावून गेली. या वेळी ती म्हणाली, हिंदुस्थानी बॅडमिंटन महासंघासह इतरांकडून मिळालेल्या सपोर्टमुळेच मला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले. तसेच येथे आल्यानंतर सर्वांकडून मिळालेले प्रेम पाहून आनंद झाला. माझ्यासाठी हा रोमांचक अन् आनंदाचा क्षण आहे, असेही ती भावुकपणे म्हणाली.



























































