स्वातंत्र्यदिनापूर्वी लाल किल्ल्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ; प्रवेशद्वारावर कंटेनर्स लावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच लाल किल्ल्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. लाल किल्ल्याच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ मोठमोठे कंटेनर लावण्यात आले आहेत. दिल्लीच्या सीमेवर आणि राजधानीतील रस्त्यांवर शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. लाल किल्ल्यात 26 जानेवारीला आंदोलकांकडून झालेल्या हिंसाचारामुळे दिल्ली पोलीस सतर्क असून आतापासूनच सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

गुप्तहेर संघटनांकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्टला आंदोलक निदर्शने करण्याची शक्यता आहे. आंदोलक पोलिसांना चकवा देत आत आले तरी त्यांना मुख्य प्रवेशद्वाराच्या आत जाता येऊ नये, यासाठी प्रवेशद्वारावरच हे कंटेनर बसवण्यात आले आहेत. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यात घुसून आंदोलक निदर्शने करण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांकडून लाल किल्ल्यावर झेंडावंदन करण्यात येते. कोरोना संकटामुळे यंदा आमंत्रितांची आणि उपस्थितांची संख्या मर्यादीत असणार आहे. तरीही पोलीस आणि सुरक्षा दल सतर्क असून किल्ल्याच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. शेतकरी आंदोलक निदर्शने करण्याची शक्यता असल्यानेच सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेता त्यादृष्टीनेही सरुक्षआ व्यवस्था तैनात करण्यात येत आहे.

वर्षभरापासून कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. शुक्रवारी जंतरमंतरजवळ शेतकरी आंदोलन करत आहेत. तसेच प्रजासत्ताकदिनी आंदोलकांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. त्यावेळी लाल किल्ल्याजवळ हिंसाचार झाला होता. त्यामुळे आता किल्ल्याच्या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.