
>> अजित कवटकर
दहशतवादाचे केंद्रस्थान, महामार्ग असलेल्या पाकिस्तानातून अतिरेक्यांची रवानगी कोणत्या दिशेने, प्रदेशाकडे होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चीन व पाकिस्तान यांचे प्रयत्न हेच राहतील की ते हिंदुस्थानच्या कश्मीरमध्ये वळावेत, पण तसे होऊ नये हे केंद्र सरकारच्या राजकीय चातुर्यावर अवलंबून असणार आहे. कितीही मोठे आव्हान उभे राहिले तरी आपले सैन्य त्यावर मात करण्यास सक्षम व समर्थ आहे, पण कश्मीर पेटतं ठेवून त्यावर आपल्या राजकीय पोळय़ा भाजण्याचे धंदे करणारे यात विघ्नं निर्माण करू शकतात.
11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या ‘सुपरपॉवर’ पदाला आव्हान देणारा भीषण दहशतवादी हल्ला त्यांच्या सुप्रसिद्ध वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झाला. हे धाडस करणाऱयांवर कायमची जरब बसविण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या अतिरेकाची त्यांना शिक्षा देण्यासाठी अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तानात घुसून तळ ठोकला. तेव्हापासून आजतागायत अमेरिकी व नाटो सैन्य हे तिथे तालिबानबरोबर निरंतरच्या धुमश्चक्रीत गुंतलेले आहेत. या युद्धजन्य कालखंडात अमेरिकेने तेथील तालिबानी वर्चस्वाला, एकाधिकारशाहीला धक्का देत राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने अफगाणी सरकार स्थापन केले हीच त्यांची या दोन दशकांतील तेथील सर्वात परिणामकारक कामगिरी म्हणता येईल, परंतु आज तालिबानने पुन्हा डोकं वर काढलेले असतानादेखील 11 सप्टेंबर 2021 पर्यंत आपले तेथील संपूर्ण सैन्य माघारी मायदेशात बोलावून घेणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घेतलेला निर्णय हा जागतिक स्तरावर आणि विशेषकरून आशिया खंडात दूरगामी परिणाम करणारा आहे. अमेरिकेच्या या निर्णयातून उद्भवणारे धोके यांची बीजं फेब्रुवारी 2020 साली दोहा येथे झालेल्या अमेरिका – तालिबान करारात पेरली गेली आहेत. हा करार केला जात असताना अमेरिकेने जाणीवपूर्वक अफगाणिस्तान सरकारला बाजूला ठेवल्यामुळे उद्या अमेरिकी सैन्याने तो देश सोडल्यानंतर तिथे पुन्हा कोणाची हुकमत प्रस्थापित होणार हे सांगायला नको. त्याची लक्षणं आतापासून दिसू लागली आहेत.
तालिबान पुन्हा आपले गेलेले प्रदेश जिंकून घेत आहेत. अफगाणी सैन्याला बऱयाच ठिकाणी आपले मोर्चे सोडून पळ काढण्याशिवाय पर्याय उरत नाही आहे. तालिबानी सैन्य हे अफगाणी सैन्यावर वरचढ ठरत असल्याचे दिसत आहे. काबूल, कंदाहारसारख्या देशातील मुख्य शहरांवर कब्जा मिळविण्याच्या उद्देशाने तालिबानी आगेकूच करत आहेत. अमेरिका – तालिबान करारात दहशतवादाला पूर्णविराम देण्याविषयी झालेली चर्चा तालिबान अशा अतिरेकातून बेदरकारपणे पायदळी तुडवत असल्याचे दिसत आहे. हे धाडस, ही ताकद, एवढी शस्त्र्ासामग्री त्यांच्याकडे आली कुठून? पाकिस्तानच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही हे सर्वज्ञात आहे. तसेच अफूची शेती, अमली पदार्थांची तस्करी, अरब देशांतील श्रीमंत धर्मांधांकडून मिळणारे अर्थसहाय्य वगैरेंच्या जोरावर ते अधिकाधिक मुजोर होत चालले आहेत. पाकिस्तान हा पहिल्यापासूनच तालिबान, अल कायदा, लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे. ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडणे त्यामुळे आश्चर्याची गोष्ट नव्हती. आता येणाऱया काळात अफगाणिस्तानात होणारा सत्ताबदल याचा अचूक अंदाज आल्यामुळे पाकिस्तान आता पूर्णपणे तालिबानला लागेल ते सहकार्य करत आहे.
तालिबानी वर्चस्वाखाली रक्तबंबाळ झालेला अफगाणिस्तान आणि त्यानंतर गेली दोन दशकं तालिबानला संपविण्याच्या अमेरिकेच्या अपयशी प्रयत्नांत अधिक गुंतून पडलेल्या अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य बाहेर पडताच तिथे येऊ घातलेले तालिबानी राज्य अधिक संहारक ठरण्याची शक्यता आहे. मानवी हक्कांची गळचेपी, महिलांवरील अत्याचार, शिक्षणाला पूर्णविराम ही त्याची सुरुवात असणार आहे. युवकांना दहशतवादी बनविण्याची कारखानदारी मात्र जोर धरेल यात शंका नाही. मध्यंतरीच्या काळात अफगाणिस्तान पूर्वपदावर येत असल्याचे पाहून हिंदुस्थान, चीन, पाकिस्तान, रशिया व इतर अनेक राष्ट्रांनी त्या देशात दाखवलेल्या रुचीतून केलेल्या प्रगतीशील गुंतवणुकीवर यापुढे टांगती तलवार लटकणार इतके नक्की. धोरणात्मक फायद्याच्या दृष्टीने आपण रुची दाखवत असलेल्या तेथील प्रकल्पांत तालिबानच्या सहाय्याने बाधा आणून नुकसान पोहोचविण्याच्या इराद्याने पाकिस्तान सक्रिय होणार. तालिबान, अल कायदा, पाकिस्तान हे रसायन जागतिक अशांततेला कारणीभूत ठरू शकणार असले तरी पाकिस्तान मात्र चहूबाजूंनी या सगळ्यातून स्वतःचा फायदा साधणार. अफगाणिस्तानशेजारील देशांना अमेरिकेचे तेथील वास्तव्य अमान्य असल्यामुळे अमेरिकेला आपला तेथील अंकुश कायम ठेवण्यासाठी नेहमी पाकिस्तानची गरज पडणार. भविष्यात तालिबानला मर्यादेत ठेवण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानलाच मध्यस्ती ठेवणे अपरिहार्य असणार. चीनचा अफगाणिस्तानात जाण्याचा मार्गदेखील पाकिस्तानातूनच असणार. थोडक्यात काय तर सर्व पापांना कारणीभूत असणाऱया अपराधी पाकिस्तानला अभय लाभत जाणार. यातूनच त्यांच्या कश्मीरविषयीच्या कुटील महत्त्वाकांक्षांना अनेक संधी दिसू लागणार.
कलम 370 रद्द केल्यानंतर कश्मीरमध्ये गेल्या काही दशकांच्या तुलनेत बऱयापैकी स्थैर्य प्रस्थापित होताना दिसत आहे. कश्मीर जरी आज केंद्रशासित प्रदेश असला तरी स्थानिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून स्वयंशासनाचे अधिकार देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे होत असलेल्या प्रयत्नांना यश मिळतानाचे जाणवत आहे. हेच स्थैर्य, सुव्यवस्था तेथील अर्थकारणाला बळ देऊन रोजगार निर्मिती करणार, तरुणांना काम मिळवून देणार. पाकिस्तानला हेच नको आहे. स्थानिकांना अतिरेकी करून, त्यांच्या हातात हत्यारं देऊन त्यांना स्वतःच्याच देशाविरोधात लढवून पाकिस्तान जगासमोर हे दर्शवू इच्छितो की, ही लढाई स्थानिक उद्रेकातून उद्भवली आहे आणि त्यात आमचा काहीच हस्तक्षेप नाही. हिंदुस्थानी सैन्याच्या नियंत्रणामुळे कश्मीरमधील अतिरेकी कारवाया या बऱयाच अंशी कमी झाल्या आहेत आणि म्हणून लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदसारख्या कश्मीरमधील दहशतवादी संघटनांनी आपल्या बऱयाच अतिरेक्यांना अफगाणिस्तानच्या लढय़ात सामील होण्यासाठी पाठविल्याचे बोलले जात आहे. उद्या तालिबानने तिथे सत्ता स्थापन केल्यावर आणि अमेरिकी सैन्याने तो देश सोडल्यावर या संघटनांना आपल्या दहशतवाद्यांना इतरत्र कुठल्यातरी सशस्त्र्ा लढय़ात गुंतवून ठेवणे आवश्यक ठरणार आहे. पाकिस्तानाच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनातून मग हे व यांच्याबरोबर मोकळे झालेले अफगाणी तालिबानी पुढे कश्मीरमध्ये घुसविण्याचा प्रयत्न केला जाईल. कलम 370 रद्द केल्याने नाराज असलेले तेथील प्रादेशिक पक्ष अशा परिस्थितीत काय छुपी भूमिका घेतात यावर तेथील पुढची परिस्थिती निर्भर असणार. पृथ्वीवरील स्वर्गाला नरक बनविण्याची अभिलाषा बाळगणारे मग दुसऱयांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मृत्यूचा खेळ खेळतील.
दहशतवादाचे केंद्रस्थान, महामार्ग असलेल्या पाकिस्तानातून अतिरेक्यांची रहदारी कोणत्या दिशेने, प्रदेशाकडे होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चीन व पाकिस्तान यांचे प्रयत्न हेच राहतील की ते हिंदुस्थानच्या कश्मीरमध्ये वळावेत, पण तसे होऊ नये हे केंद्र सरकारच्या राजकीय चातुर्यावर अवलंबून असणार आहे. कितीही मोठे आव्हान उभे राहिले तरी आपले सैन्य त्यावर मात करण्यास सक्षम व समर्थ आहे, पण कश्मीर पेटतं ठेवून त्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचे धंदे करणारे यात विघ्नं निर्माण करू शकतात. कश्मिरी जनतेला प्रगतीच्या मुबलक संधी उपलब्ध करून दिल्यास तीच समोर दिसत असलेल्या हिंदुस्थानातील आपल्या उज्ज्वल भविष्यामध्ये कुणाला अतिरेक वा अतिक्रमण करू देणार नाही.





























































