संभाजीनगरमधील उद्योजकांवरील हल्ले रोखा; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगरमध्ये उद्योजकांवर होणारे हल्ले गंभीर असून ते तातडीने रोखावेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

उद्योजकांवरील हल्ल्यामुळे महाराष्ट्राबाहेर जाणारे विपरीत चित्र, यामुळे रोजगारांवर येणारी गदा इत्यादींचा गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने पावले उचलण्यात यावीत. तसेच जलदगती न्यायालयात खटले चालवून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

संभाजीनगरमध्ये भोगले उद्योग समूहाचे प्रबंध संचालक नित्यानंद भोगले, उत्पादन व्यवस्थापक सोनगीरकर, कार्मिक व्यवस्थापक भूषण व्याहाळकर या तिघांना गुंडांकडून मारहाण झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय इतर काही घटनांचा उल्लेख या पत्रात केला आहे.