देवीयो और सज्जनो… अॅलेक्सा बिग बी यांच्या आवाजात मारणार गप्पा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘देवीयो और सज्जनो…’ असा आवाज ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर येतात ते बिग बी अमिताभ बच्चन. बिग बी यांचा आवाज आजपासून अॅमेझॉनच्या अॅलेक्सावर ऐकायला मिळणार आहे. अॅलेक्सासाठी स्वतःचा आवाज देणारे बिग बी हे पहिले हिंदुस्थानी सेलिब्रेटी ठरले आहेत. अॅमेझॉन शॉपिंग अॅपवरील माईक आयकॉन दाबून बच्चन यांचा आवाज त्यांच्या इको स्मार्ट डिस्प्ले आणि स्पीकरमध्ये युजर्स जोडू शकतात. सध्या हे फीचर केवळ अॅन्ड्रॉईडसाठी उपलब्ध आहे.

तुम्ही फक्त ‘अॅलेक्सा मला अमिताभ बच्चन यांची ओळख करून द्या,’ अशी आज्ञा देऊ शकता आणि नंतर “अमित जी’’ शब्द वापरून त्यांच्याशी संवाद साधू शकता. आपण त्यांच्या जीवनातील कथा, त्यांच्या वडिलांच्या कवितांची निवड, प्रेरक कोटस् असे बरेच काही ऐकू शकता. याव्यतिरिक्त, युजर “अमित जी’’ यांना गाणी वाजवण्यास, अलार्म सेट करण्यास आणि हवामानचे अपडेटस् मिळविण्यास सांगू शकता. “अमित जी, सिलसिला के गाणे बजाये’’ असे म्हणत तुम्ही आज्ञा देऊ शकता. एवढेच नाही तर, “अमित जी, माझा वाढदिवस आहे’’ असे सांगून तुम्ही अमिताभ बच्चन यांना तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सांगू शकता. याबाबत अमिताभ बच्चन म्हणाले, “अॅलेक्सावर माझा आवाज सादर करण्यासाठी अॅमेझॉनसोबत काम करणे हा एक नवीन अनुभव होता. माझे हितचिंतक आता या नवीन माध्यमाद्वारे माझ्याशी संवाद साधू शकतील. चाहत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक आहे.’’