यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात ओवसा साजरा होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या गणेशोत्सवात गौरींचे आगमन पूर्वा नक्षत्रात होणार असल्याने नवीन लग्न झालेल्या सुवासिनींना ओवसा (ओवासणे ) हा पारंपरिक विधी साजरा करता येणार आहे. यावर्षी ओवसा साजरा करण्याची वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. यंदाच्या गणेशोत्सावात ओवसा साजरा होणार असल्याने ओवशासाठी आवश्यक असणार्‍या सुपांच्या खरेदीविक्रीला तालुक्यात सुरुवात झाली आहे. तसेच एक ओवसा (छोट्या मोठ्या सुपांचा संच) 1200 ते 1300 रुपयांना विकला जात आहे. सध्या यांची मागणी वाढली आहे.

या प्रथेसाठी बांबूच्या बिळशांपासून वळलेली 5 सुपे आवश्यक असतात. यातील 3 सुपे मोठी तर 2 लहान असतात. नवीन लग्न झालेल्या सुवासिनीने लग्नानंतर गणेशोत्सवात गौरींचे आगमन पूर्वा नक्षत्रात झाल्यास ओवसा साजरा करायचा असतो. यासाठी 5 सुपांमध्ये विविध प्रकारची फळे, सौभाग्य लेणं, तांदूळ, ओटी आदी विविध प्रकारचे पूजा साहित्य मांडून ही सुपं गौरीसमोर ठेवून त्याची मनोभावे पूजा करायची आणि गौरीला नैवेद्य दाखवायचा असतो. याचे पूजन झाल्यावर सर्वांनी या सुपांचे दर्शन घ्यायचे, अशी रीत आहे. लग्नानंतर पहिल्याच वर्षी गौरी पुर्वा नक्षत्रात आल्यास हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यानंतर हा सण घरगुती स्वरुपात साजरा करण्यात येतो.

ओवसासाठी लागणारी बांबूची सुपं वळप करून घट्ट विणीने तयार करणारे कारागिर कमी झाले आहेत. नव्या पिढीमध्ये याबाबत जास्त माहिती आणि आवड नसल्याने आजही वयोवृध्द मंडळीच हे काम करतात. हा प्रकार म्हणजे वळप कारागिरांसाठी हक्काचा रोजगार असून संगमेश्‍वर तालुक्यातील शिवने, तेर्‍ये, बुरंबी या गावांमध्ये बांबूचे वळपकाम करणारे कारागिर मोठ्या प्रमाणावर आहेत. हे काम खूप कठीण आणि वेळकाढू असते. ज्या वर्षी गौरींचे आगमन पूर्वा नक्षत्राला होते त्याच वर्षी या सुपांची मागणी वाढते आणि यातून या कारागिरांना चांगला रोजगार मिळतो.

यावर्षीच्या गणेशोत्सवात गौरी पूर्वा नक्षत्रालाच येत असल्याने यावर्षी लग्न झालेल्या सुवासिनींचा ओवसा साजरा होणार आहे. मात्र यावर्षीचे ओवसे दुपारी 3 वाजेपर्यंतच साजरे करता येणार आहेत. यासाठी आत्तापासूनच संगमेश्‍वर आणि देवरुख बाजारपेठेत ओवशाच्या सुपांची विक्री सुरू असून सध्या 5 सुपांच्या एका ओवशाची विक्री 1200 ते 1300 रुपयांना होत आहे. चाकरमानी गावी दाखल झाल्यानंतर या ओवशांची मागणी वाढणार आहे आणि त्यांची किंमत 1500 ते 1700 रूपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.