
राज्य सरकारने कोरोनाविषयक निर्बंध शिथिल केल्याने बेस्ट आणि एसटीची गर्दी वाढली आहे. लोकलमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना अटीतटीवर परवानगी असल्याने अडीच लाखांवर लसीकरण पूर्ण झालेले पासधारक झाले असले तरी लोकलची गर्दी म्हणावी तशी वाढलेली नाही. बेस्टची दररोजची प्रवासीसंख्या मात्र 22 लाखांवर गेली आहे. गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नोव्हेंबर 2020मध्ये बेस्टची रोजची प्रवासीसंख्या 22 ते 23 लाखांपर्यंत गेली होती.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा संसर्ग कमी होत असल्याने निर्बंध कमी करण्यात आले आहेत. 15 ऑगस्टपासून सर्वसामान्य नागरिकांना लोकलप्रवासाची अटी आणि शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे. दोन लसी आणि 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना लोकलचा प्रवास करता येत आहे. मध्य रेल्वेवर उपनगरीय लोकलमध्ये आधीपासूनच अत्यावश्यक सेवेतील 14 ते 15 लाख प्रवासी प्रवास करीत होते. तर पश्चिम रेल्वेवर 10 लाख अत्यावश्यक सेवेतील प्रवासी प्रवास करीत होते.
बेस्टमध्ये गर्दी वाढत चालली…
बेस्टच्या बसमध्ये शंभर टक्के क्षमतेने प्रवासी घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर प्रवासीसंख्या पुन्हा वाढली आहे. बेस्टमध्ये उभ्याने प्रवासी घेऊ नयेत, असे आदेश असले तरी आता उभे प्रवासी सर्रास बसमध्ये दिसत आहेत. बेस्टच्या दररोज सुमारे 3 हजार फेऱया होत असून 15 ऑगस्ट रोजी 24 लाख 26 हजार 65 इतकी होती. तर 16 ऑगस्ट रोजी 22 लाख 77 हजार 968 इतकी प्रवासीसंख्या नोंदली गेली होती. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर बेस्टची प्रवासीसंख्या 22 लाखांपर्यंत गेली होती. 2004 मध्ये बेस्टची रोजची प्रवासीसंख्या सुमारे 45 लाख होती. त्यानंतर अनेक कारणांनी बेस्टच्या प्रवासीसंख्येची घसरण सुरू झाली.


























































