पुढील एक महिना जबाबदारीचा, संयमाच्या परीक्षेचा; टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत सद्यस्थितीत कोरोना पूर्ण नियंत्रणात आला असला तरी 15 ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्यांसाठी सुरू झालेल्या रेल्वेत वाढलेली गर्दी, सणासुदीच्या काळात होणारी गर्दी यामुळे पुढील महिनाभराचा कालावधी खऱया अर्थाने ‘जबाबदारी’चा आहे. या काळात कोरोना खबरदारी घेतली नाही तर रुग्णवाढ होण्याचा धोका आहे. त्यामुळे पुढील एक महिना प्रत्येकासाठी ‘जबाबदारी’चा असल्याचे प्रतिपादन राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी केले आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. 35 ते 50 हजारांवर चाचण्या होत असताना दोनशे ते तीनशेच्या संख्येने दररोज रुग्ण आढळत आहेत. ही आकडेवारी समाधानकारक असली तरी पुढील चार आठवडे मात्र आपल्याला गर्दी वाढू नये आणि वाढली तरी मास्कसह आवश्यक काळजी घेणे अनिवार्य असल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले. मुंबई व राज्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. तरी पुणे, नगर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिह्यांत अजूनही खबरदारी घ्यायला हवी. संबंधित भागात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोकाही असल्याने या ठिकाणी जाताना किंवा आल्यावर विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचेही डॉ. सुपे यांनी सांगितले.

…म्हणूनच मुंबईला दिलासा

z मुंबईची लोकसंख्या एक कोटी 30 लाखांवर असली तरी आतापर्यंत 70 टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. 35 लाख मुले सोडली तर सात ते आठ लाख जणांना कोरोना होऊनही गेला.
z मुंबईत रुग्ण 21 ऑगस्टपर्यंत रुग्ण दुपटीच्या कालावधीने 2023 दिवसांचा कालावधी गाठला आहे. सद्यस्थितीत केवळ 2825 सक्रिय रुग्ण असून यातील 1170 रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणेही नाहीत.
z मुंबईत रुग्ण बरे होण्याचा कालावधी 97 टक्के असून रुग्णवाढीचा कालावधी 0.04 झाला आहे. तर आतापर्यंत 740871 जणांना कोरोना झाला असला तरी यातील तब्बल 7 लाख 19 हजार 662 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.