
दक्षिण हिंदुस्थानात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने चिंता वाढवली आहे. केरळमध्ये कोरोनाचे वाढते संक्रमण कमी होत नसून कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना केरळमध्ये मात्र रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. केरळमध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूदरही वाढत आहे. त्यामुळे केरळमध्ये कोरोनाने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
केरळमध्ये दररोज 30 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. गेल्या 24 तासात केरळमध्ये 29,682 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 142 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केरळमध्ये वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय असून मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इतर राज्याच्या तुलनेत केरळमध्ये संक्रमणाचा वेग वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 150 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू होत आहे.
केरळमधील संक्रमणाचा दरही चिंता वाढवणारा आहे. देशभरात पॉझिटिव्हिटी दर 2 टक्क्यापर्यंत असताना केरळमध्ये संक्रमणाचा दर 17.54 टक्के आहे. या आकडेवारीवरून केरळमध्ये कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही अनेकजण कोरोनामुक्त होत असल्याने केरळला काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. गेल्या 24 तासात 25,910 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेत राज्यात रविवारीही लॉकडाऊन कायम ठेवला आहे. राज्यात रात्रीचा कर्फ्यूही कायम राहणार आहे. कोरोनाचा वाढता वेग लक्षात घेता निर्बंधांमध्ये कोणतीही सूट देण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. कोरोनास्थितीमुळे राज्यातील 11 वीच्या प्रत्यक्ष घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.




























































