
महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱयांना गेल्या वर्षीप्रमाणेच नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेले ‘जलसमाधी आंदोलन’ स्थगित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चर्चेसाठी आमंत्रित केल्यानंतर नृसिंहवाडी येथे झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली.
यंदाच्या वर्षी आलेल्या महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱयांना 2019च्या महापुराप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी राजू शेट्टी यांनी ‘जनआक्रोश’ पदयात्रा सुरू केली होती. तिचा समारोप नृसिंहवाडी येथील पंचगंगा-कृष्णा संगमावर जलसमाधी घेऊन करणार असल्याची घोषणा शेट्टी यांनी केली होती. नृसिंहवाडी येथे झालेल्या सभेत महापूरग्रस्त शेतकऱयांना मदत देताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून दुजाभाव झाल्याचा घणाघाती आरोप राजू शेट्टी यांनी केला. महाराष्ट्रात सातत्याने येणाऱया पुरांचा गांभीर्याने विचार करून याबाबतच्या उपाययोजनांसाठी केंद्रीय जल आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, पदयात्रा कुरुंदवाड येथून नृसिंहवाडी येथे येत असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने पंचगंगा नदीत उडी घेतली. त्याला वाचविण्यात ‘रेस्क्यू फोर्स’च्या जवानांना यश आले.
























































