
नगरमधील 13 वर्षांच्या मुलीचा 24 वर्षांच्या तरुणाशी विवाह लावून दिल्यानंतर मुलीच्या मनाविरूद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची घटना नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथे घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या आईसह मावशी, काका, नवरा, सासू, सासरा यांच्यासह दोन मांत्रिकांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेवासा फाटा येथील एका शाळेतील मुलीच्या आई, मावशी व काकाने 24 मे रोजी माळीचिंचोरा येथील एका 24 वर्षीय तरुणाशी मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर पीडित मुलगी 5 सप्टेंबरपर्यंत सासरी राहिली. या काळात तिच्या पतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तर, घरकाम येत नाही, असे म्हणत नवरा, सासू, सासरे तिला रोज शिवीगाळ व मारहाण करीत होते. त्यामुळे पीडित मुलगी त्यांना घरी नेऊन सोडा, असे म्हणत असे. यावरून पीडितेला बाहेरची बाधा झाली आहे. ती आपल्या घरी राहत नाही म्हणून तिला राहुरी तालुक्यातील मांजरी व नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील मांत्रिकांकडे नेण्यात आले. तेथेही तिला मारहाण करण्यात आली.
5 सप्टेंबर रोजी पीडितेच्या पतीने तिच्या आईला बोलावून घेत ‘ही आमच्याकडे राहत नाही. तिला बाहेरची बाधा झाली आहे. त्यामुळे तिला तुमच्या घरी घेऊन जा,’ असे सांगून घरातून बाहेर काढले. त्यानंतर पीडितेच्या आईने तिला नेवासा तालुक्यातील खडका येथे आजोबांच्या घरी आणले. लग्न झाल्याचे आजोबांना माहीत नव्हते. त्यामुळे ‘हा प्रकार आजोबांना सांगायचा नाही,’ असा दम आईने तिला भरला होता. मात्र, तरीही धीर एकवटून दोन दिवसांपूर्वी पीडितेने घडलेला प्रकार तिच्या आजोबांना सांगितला. त्यानंतर पीडितेने नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीवरून नेवासा पोलिसांनी मुलीची आई, मावशी व काकासह पती, सासू व सासरे (तिघे रा. माळीचिंचोरा, ता. नेवासा), तसेच खरवंडी (ता. नेवासा) व मांजरी (ता. राहुरी) येथे मांत्रिकांवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकुर अधिक तपास करीत आहेत.



























































