
आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी तीन वर्षांच्या मेहनतीनंतर एक खास उपकरण विकसित केले आहे. पाण्याच्या थेंबापासून वीज तयार करणारे हे उपकरण आहे. अशा प्रकारच्या वीजनिर्मितीमधून मोबाईल, घडय़ाळ, डिजिटल थर्मामीटर, रेडियो, हेल्थ केअर सेन्सर आदी लहान विद्युत उपकरणे चार्ज होऊ शकतात, असा दावा संशोधकांनी केला आहे. लवकरच त्याची पेटंट प्रक्रिया सुरू होणार आहे.
आयआयटी दिल्लीच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. नीरज खरे आणि त्यांची टीम हे संशोधन करत आहे. यामध्ये ट्रायबोइलेक्ट्रिक इफेक्ट आणि इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शनचा वापर करून पाण्याच्या थेंबापासून वीजनिर्मिती करता येईल. यातून काही मिलीवॅट वीज निर्माण होईल. त्याच्या मदतीने छोटी उपकरणे चार्ज करता येतील. मोबाईल सह अन्य काही छोटय़ा उपकरणांची चार्जिंगची समस्या सुटेल.
या उपकरणाला लिक्विड सॉलिड इंटरफेस ट्रायबोइलेक्ट्रिक नॅनोजनरेटर असे नाव दिले आहे. या उपकरणाचे डिझाईन खूप साधे असून ते ट्रायबोइलेक्ट्रिक इफेक्टवर आधारित आहे. यामध्ये नॅनो कम्पोझिट पॉलिमर फिल्म आणि दोन इलेक्ट्रोड बसवण्यात आले आहेत. पावसाच्या पाण्यापासून वीज तयार करण्याचे अनेक प्रयोग आपल्या देशात होत आहे. नवे तंत्रज्ञान त्या दिशेने खूप उपयुक्त ठरू शकते.

























































