पुणे – फळविक्रेत्यामुळे सराईत मोबाईल चोर टोळीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील एका जागरूक फळ विक्रेत्यामुळे सराईत मोबाईल चोर टोळीला पकडण्यात विमानतळ पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून 14 मोबाईल जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या हस्ते फळविक्रेता दत्ता भारत खाडे (रा. विमाननगर) यांचा सत्कार करण्यात आला.

विमानतळ पोलिसांकडून मोबाईल चोरणाऱ्यांचा सीसीटीव्ही फुटेजनुसार शोध घेण्यात येत होता. त्यावेळी दत्तमंदिर चौकात फळ विक्रीचे काम करणारे दत्ता खाडे यांनाही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखविले होते. नंबर प्लेट नसलेल्या दुचाकी दिसल्यास पोलिसांना माहिती देण्यास त्यांना सांगितले होते. त्यानंतर 9 सप्टेंबरला दत्ता यांना नंबर प्लेट नसलेल्या दुचाकी जाताना दिसली असता त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या आदेशाने तपास पथकाचे प्रमुख सचिन जाधव, अनिल शेवाळे, सचिन जाधव, अंकुश जोगदंड, गणेश साळुंके यांनी चोरट्यांना पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून चोरीचे 14 मोबाईल जप्त केले. आरोपी हे मळचे कर्नाटक येथील राहणारे असून ते शिवाजीनगर परिसरात ज्युस, फळे विक्रीची कामे करत होते. मात्र, लॉकडाऊननंतर त्यांचा धंदा होत नसल्यामुळे त्यांनी मोबाईल चोरीला सुरूवात केली. आयटीतील महिला रस्त्याने फोनवर बोलत जात असताना त्यांचे मोबाईल हिसकावत असल्याचे तपासात उघड झाले आहे.