पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्राला संबोधित करणार; दहशतवाद, लसीकरणाच्या मुद्दय़ावर जगाचे लक्ष वेधणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशनाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. या आमसभेत भाषणांना सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण करणार आहेत. या आमसभेच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद व सर्वांना समान आणि किफायतशीरपणे लस उपलब्ध व्हावी याकडे जगाचे लक्ष वेधणार आहेत,  अशी माहिती हिंदुस्थानचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत टी.एस.तिरुमूर्ती यांनी दिली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या या आमसभेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव, त्याचे समाजावर झालेले परिणाम आणि अफगाणिस्तानातील घडामोडी हे दोन मुद्दे चर्चेत राहतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी, दहशतवाद, हवामानातील बदल, पश्चिम आशिया व आफ्रिकेतील सध्याचे संघर्ष, सुरक्षा परिषदेतील सुधारणा या मुद्दय़ांवरही चर्चा होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 सप्टेंबर रोजी या आमसभेत भाषण करणार आहेत.

मोदींच्या भाषणात या बाबींचा समावेश
जगातील महत्त्वाच्या मुद्दय़ांना हिंदुस्थानने कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमसभेतील भाषणाकडे जगातील सर्व नेत्यांचे लक्ष लागले आहे. जगासमोर भेडसावणारे अनेक महत्त्वाचे मुद्दे भाषणांमधून येत असल्याचे राजदूत तिरुमूर्ती यांनी सांगितले. हवामानातील बदल, शाश्वत विकास, दारिद्रय़ निर्मूलन, महिला सबलीकरण आणि प्रशासनातील सहभाग, सर्वांना लसीकरण, शांतता, हिंद–प्रशांत आणि संयुक्त राष्ट्रांतील सुधारणा या गोष्टी हिंदुस्थानकडून मांडण्यात येणार आहेत.