छोट्याने चोरी केली, मोठ्याकडे सोने सापडले; भायखळा पोलिसांची दिल्लीत कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन महिने इमानेइतबारे काम करत असल्याचे नाटक करून सोन्याचे दागिने बनविण्याच्या कारखान्यात काम करणारा तरुण सराफाचे दोन हजार 383 ग्रॅम वजनाचे सोने घेऊन पसार झाला. सोने घेऊन त्याने आग्रा गाठले. भायखळा पोलीसदेखील त्याच्या मागोमाग आग्र्यात धडकले, पण तो काही हाती लागला नाही. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करत आरोपीच्या मोठय़ा भावाला उचलले आणि दोन हजार 127 ग्रॅम सोने हस्तगत केले.

भायखळा येथील सक्सेस इंडस्ट्रीजमध्ये नितेश जैन या सराफाचा सोन्याचे दागिने बनवायचा कारखाना आहे. तेथे मूळचा आग्र्याचा रहिवासी असलेला राजेश दागिने बनवायचे काम करायचा. तीन महिने त्याने व्यवस्थित काम केले. पण सोने बघून त्याची नियत फिरली आणि त्याने चोरी करायचा कट रचला. त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी मालकाने दागिने घडविण्यासाठी दिलेले दोन हजार 383 ग्रॅम सोने घेऊन तो पळून गेला. राजेशने चोरी केल्याचे स्पष्ट होताच जैन यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक अभ्यास केला असता राजेश आग्र्याला गेल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पथक आग्र्याला गेले, पण राजेश त्याची पत्नी, आई, वडील व भावाला घेऊन तेथूनदेखील पसार झाला होता.

राजेश सटकला बिपीन सापडला

वरिष्ठ निरीक्षक खोत यांच्या मार्गदर्शनानुसार एपीआय सुहास माने, उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, रूपेश पाटील, ज्ञानेश्वर खरमाटे व पथक पुन्हा आग्र्याला गेले. त्यावेळी राजेशचा मोठा भाऊ बिपीन त्या परिसरात आल्याची कुणकुण लागताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरात लपवलेले दोन हजार 227 ग्रॅम सोने काढून दिले. पोलिसांनी बिपीनला पकडून मुंबईत आणले असून राजेशचा शोध सुरू आहे.