
बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन हातसफाई करणाऱया तीन महिलांना समतानगर पोलिसांनी अटक केली आहे. अनुसया गायकवाड, मारूबाई गायकवाड आणि बेबी गायकवाड अशी त्या तिघींची नावे आहेत. बेबी आणि अनुसया या दोघी जावा आहेत. चोरीच्या गुह्यात त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
तक्रारदार या कांदिवली परिसरात राहतात. गेल्या आठवडय़ात त्या कामानिमित्त भांडुप येथे गेल्या होत्या. घरी येण्यासाठी त्यांनी भांडुप येथून बस पकडली. कांदिवली पूर्व येथील बस स्टॉपवर उतरल्या. तेथून घरी जाण्यासाठी त्या रिक्षात बसल्या असता त्यांनी त्याची पर्स तपासली तेव्हा पर्समध्ये 55 ग्रॅमचे मंगळसूत्र नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मंगळसूत्र चोरीप्रकरणी तक्रारदारांनी समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक आनंदराव हाके यांच्या पथकातील उपनिरीक्षक इंद्रजित पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी कांदिवली पूर्व येथील एका बस स्टॉपजवळील सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा तीन महिला या घाईघाईत बसमधून उतरून रिक्षाने गोरेगावच्या दिशेला जात असल्याचे एका फुटेजमध्ये दिसले. तोच धागा पकडून भांडुप पोलिसांच्या मदतीने अनुसया, मारूबाई आणि बेबीला अटक झाली.
पैसे व्याजाने द्यायच्या
त्या तिघी बस, रेल्वेमध्ये चोरी करायच्या. महिलांच्या पर्समधील पैसे आणि मंगळसूत्र घेऊन त्या काही सेकंदातच तेथून पळ काढायच्या. चोरीचे पैशातील काही रक्कम घरखर्च तर उर्वरित रक्कम त्या व्याजाने देत असायच्या. त्या तिघींनी काहींना पैसे व्याजाने दिल्याचे तपासात समोर आले आहे.




























































