
सत्ता काबीज करण्यासाठी राज्य सरकारने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा बेकायदेशीर निर्णय घेतला, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. याविरुद्ध लोकांनी न्यायालयात जावे, निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
नाशिकमध्ये गुरुवारी शाखाप्रमुखांच्या मेळाव्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपा युती आणि आता महाविकास आघाडी सरकारने महापालिकांसाठी एकच्या वॉर्डऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला आहे, तो केवळ पैसा ओतून सत्ता काबीज करण्यासाठीच. देशात कुठल्याही राज्यात अशी पद्धत नाही. निवडणुकांची थट्टा करून ठेवलीय. तीन मतं देवून लोकांनी त्रास का करून घ्यायचा, असे ते म्हणाले. खासदारकी, आमदारकीलाही तीनचा प्रभाग करणार का, असा सवालही त्यांनी केला. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून एकमेकांविरुद्ध केलेल्या वक्तव्याबाबत ते म्हणाले की, काय चालू आहे हे मला कळतच नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल ते म्हणाले की, आपण कुठल्या पदावर बसलोय, काय बोलतोय हे समजायला हवे.



























































