
जाचक कृषी कायद्यांविरोधात मागील अनेक महिने आंदोलन करीत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी ‘हिंदुस्थान बंद’ची हाक दिली आहे. या बंदला विविध शेतकरी संघटनांबरोबरच काँग्रेस, आम आदमी पक्षासह अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
‘हिंदुस्थान बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा
वाढती महागाई, शेतकऱयांविरोधातील तीन काळे कृषी कायदे आणि सरकारी कंपन्यांचे करण्यात येत असलेले खासगीकरण या विरोधात केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवार, 27 सप्टेंबरला शेतकरी संघटना आणि डाव्या संघटनांकडून ‘हिंदुस्थान बंद’ पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये काँग्रेसही सक्रिय सहभाग घेणार आहे.
देशवासीयांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या हुकूमशाही राजवटीने आणलेले शेतकरीविरोधी तीन काळे कायदे, रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उद्योग, दूरसंचार, बंदरे इत्यादींचे होत असलेले खासगीकरण, दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई आणि बेरोजगारी यांच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटना, सर्व डाव्या आघाडींनी ‘हिंदुस्थान बंद’ चे आवाहन केले आहे. मुंबई काँग्रेसचा आंदोलनाला पाठिंबा असून भाजपच्या हुकूमशाही व कपटी राजवटीचा निषेध केला जाईल, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.




























































