लोकसहभागातील साहित्य संमेलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>पंजाबराव मोरे

लोकसहभागातून अनेक असाध्य प्रश्न मार्गी लागल्याची अनेक उदारहणे आहेत. लोकांच्या म्हणजे जनता जनार्दनाच्या मनात आले तर काय होऊ शकते याचे अत्यंत जाज्वल्य आणि आदर्श उदाहरण म्हणजे संभाजीनगर येथे 25 आणि 26 सप्टेंबर रोजी पार पडलेले मराठवाडा साहित्य परिषदेचे लोकसंवाद फाऊंडेशन आयोजित 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन.

संभाजीनगर शहरातील प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अशा मोजक्याच लोकांनी समाजिक बांधिलकीतून अलीकडेच स्थापन केलेल्या लोकसंवाद फाऊंडेशनने नुकतीच मराठवाडा साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी उचलली आणि मराठवाडा पातळीवरील संमेलन अखिल भारतीय संमेलनाच्या तोडीचे करून दाखविले. जाज्वल्य आणि आदर्श यासाठी की प्रख्यात साहित्यिक बाबू बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन अवघ्या 25 दिवसांच्या विक्रमी वेळेत आयोजित करण्यात आले. यातील बहुतेक सदस्य प्राध्यापक असल्याने संमेलनाचे नियोजन, कामाची वाटणी, पाठपुरावा आणि प्रत्येकातील साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेण्याची झिंग तसेच लहानमोठय़ा कामात स्वतःला झोकून देण्याची धडपड लक्ष वेधून घेत होती. त्यामुळेच अत्यंत कमी वेळेत हे साहित्य संमेलन ताकदीने उभे राहिले आणि सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले.

साहित्यिक-रसिकांची कोंडी फुटली

कोरोनाच्या विषाणूने दीड वर्षापासून नागरिकांना सळो की पळो करून सोडले. त्यात नेहमीच रसिकांच्या गर्दीत वावरण्याची सवय असलेल्या साहित्यिकांची झालेली मोठी कोंडी या साहित्य संमेलनाने पह्डली. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करीत मरराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाटय़गृह अर्थात यशवंतराव चव्हाण साहित्यनगरी आणि डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृह (प्राचार्य प्र. ई. सोनकांबळे व्यासपीठ) या दोन ठिकाणी दोन्ही दिवस आयोजित करण्यात आलेल्या चार परिसंवाद, दोन कविसंमेलने आणि एक प्रकट मुलाखत, कथाकथन आणि नाटय़प्रयोग या नियोजनबद्ध कार्यक्रमांत साहित्यिक आणि विचारवंतांनी मोठय़ा उत्साहाने सहभाग नोंदवला. तर या प्रत्येक कार्यक्रमाला हाऊसफुल्ल साहित्य रसिकांनी उपस्थितीने साहित्यिकांना भरभरून प्रतिसाद दिला.

 परिसंवादांतून मार्मिक मंथन

समाजाला भेडसावणाऱया महत्त्वपूर्ण विषयांवर मार्मिक विचारमंथन हे अत्यंत कमी वेळेत यशस्वी झालेल्या या साहित्य संमेलनाचे विशेष. या दोन दिवसांत तब्बल चार परिसंवाद पार पडले. यात जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर आली आहे’ या टोकदार विषयावर संजय आवटे, अलका धुपकर, रवींद्र केसकर, नंदकिशोर पाटील, वैजीनाथ अनमुलवाड यांनी मत मांडले. सु. ग. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ‘आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर’ या दुसऱया परिसंवादात डॉ. दीपा क्षीरसागर, राम रौनेकर, रवींद्र बेंबरे, संजय जगताप, मोहीब कादरी यांनी संत साहित्याचा प्रभाव विषद केला. राम रौनेकर यांनी धर्म म्हणजे स्वतःबरोबर समाजाचा विकास करणे होय. अहंकार नसावा हे संतांनी सांगितले. दया, क्षमा, शांती ही संतांनी सांगितलेले गुण स्वीकारले पाहिजे. इंद्रियांची निवृत्ती म्हणजे मोक्ष असल्याचे सांगितले. लातूर येथील शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखालील ‘आजचा शेतकरी धोरणकर्त्या राजकारण्यांचा बळी’ या परिसंवादात नाटय़लेखक राजकुमार तांगडे, बालाजी इंगळे, केदार काळवणे, नारायण शिंदे आणि नारायण तवार यांनी शेतकऱयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकला.
ललिता गादगे यांच्या अध्यक्षतेखालील ‘मराठी लेखिका-कवयित्रींचे लेखन स्त्राrवादात अडकले आहे’ या विषयावरील परिसंवादात भगवान काळे, समिता जाधव, योगिनी सातारकर-पांडे, शिवराज गोपाळे, महेश मंगनाळे यांनी पुरुषांच्या सोयीच्या व्यवस्थेत महिलांना मुक्तपणे लिहिता येत नाही, त्यांच्या लेखनाचा संबंध त्यांच्या चारित्र्याशी जोडला जात असल्याची खंत व्यक्त करीत तिला लिहिण्यासाठी मोकळे वातावरण निर्माण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या परिसंवादात वक्त्यांनी स्त्राrवादावर गहन चर्चा करीत मराठी लेखिका-कवयित्रींच्या लेखनाविषयीचे अनेक पदर उलगडून दाखविले. या संमेलनात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक श्रीकांत देशमुख यांची प्रकट मुलाखत रंगली. दिगंबर कदम यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाच्या कार्यक्रमात यामध्ये राजेंद्र गहाळ, बबन महामुनी, शंकर विभुते, विलास सिंदगीकर आणि अनिता येलमटे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या संमेलनात पार पडलेल्या दोन कविसंमेलनांत सहभागी कवींनी समाजातील ज्वलंत प्रश्नांवर आसुड ओढले. या कविसंमेलनांना रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. या संमेलनाचे उद्घाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि समारोपात उपस्थित असलेले राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मराठवाडय़ातील साहित्य चळवळीचे तोंडभरून कौतुक केले.

मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले- पाटील यांनी मराठीचे उगमस्थान मराठवाडाच असल्याचे याहीवेळी ठासून सांगितले आणि मराठवाडा तसेच मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात विविध उपक्रम राबविण्यासाठी मसापला मदत देण्याचे आवाहन केले. मराठवाडा साहित्य संमेलन उत्तम प्रकारे आयोजित केल्याबद्दल लोकसंवादचे अध्यक्ष तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांच्या सर्व टीमचे तोंडभरून कौतुक केले. संमेलनाच्या समारोपातील खुल्या अधिवेशनात मराठी भाषेचा विकास, मराठी शाळांची गळचेपी थांबविणे, जिल्हास्तरीय मराठी भाषा समित्या, मराठीतून सर्व व्यवहार इतर राजकीय ठराव संमत झाल्यानंतर या संमेलनाचे सूप वाजले.

या साहित्य संमेलनासाठी उपस्थित पुस्तक विव्रेत्यांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि पावसाचे वातावरण असतानाही मोठय़ा प्रमाणात ग्रंथ खरेदी केली. यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीसमोरील सेल्फी पॉइंटने येथे आलेल्या साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना एक सेल्फी काढण्याची भुरळ घातली. एपंदरीत दोन दिवस चाललेल्या या साहित्यिक आणि साहित्यप्रेमींचा मेळा संभाजीनगरातील साहित्य प्रांतात चैतन्य पेरून गेला एवढे मात्र नक्की.