
शहरातील गोवंश हत्या आणि अवैध कत्तलखान्याचा प्रश्न ऐरणीवर असताना बेकायदेशीर गोवंश हत्या करणाऱयांनी स्वतःच जेसीबीच्या साहाय्याने आपले कत्तलखाने जमीनदोस्त करण्याचे काम सुरू केले आहे. हे सर्व अवैध बांधकाम असून, ते पूर्णपणे पाडण्यात येत आहे. त्याकडे पालिकेचे लक्ष आहे, असे पालिकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.
संगमनेर शहरात दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अवैध कत्तलखान्यांवर मोठी कारवाई केली. ही कारवाई महाराष्ट्रात सगळ्यात मोठी कारवाई ठरली. त्यामुळे गोवंश हत्यांची संपूर्ण घडामोड चव्हाटय़ावर आली. संगमनेर शहरातील संतप्त हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढून प्रशासन आणि पोलिसांना यासंदर्भात जाब विचारला होता. धरणे आंदोलन, मोर्चा यामुळे पोलिसांनी व प्रशासनाने बेकायदेशीर कत्तली करणारे कत्तलखाने जमीनदोस्त करण्यासह प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱयांवर येत्या सात दिवसांत कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार आज दुपारी कुठलीही वादग्रस्त घटना घडू नये म्हणून कत्तलखान्याच्या मालकांपैकी काही संबंधितांनी स्वतःहून जेसीबीच्या साहाय्याने बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. हे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
नगरपालिकेचे संबंधित अधिकारी व पोलीस मोठ्या फौजफाटय़ासह तेथे उपस्थित असल्याने ही कारवाई नगरपालिकेकडून केली जात असल्याचा भास होत होता. मात्र, प्रत्यक्षात कत्तलखाने चालकांनीच ही बांधकामे पाडली असून, पालिका व पोलीस प्रशासन यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सात दिवसांत दोषी पोलीस अधिकाऱयांवर कारवाईचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार आता या पोलीस अधिकाऱयांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.




























































