
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील यांच्या कथीत राजीनामा नाटय़ामुळे महाभारत घडू लागले आहे. बँकेच्या चौकशीला स्थगिती दिली असली, तरी या प्रकरणात सीईओ व बँकेच्या काही संचालकांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाच्या शेवटच्या बैठकीत त्यांचे पडसाद उमटले. काही संचालकांनी सीईओ कडू-पाटील यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणला. मात्र, त्यांनी राजीनामा देऊ नये, असा पवित्रा काही संचालकांनी घेतला. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाची शेवटची सभा चांगलीच गाजली.
जिल्हा बॅँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची शेवटची सभा बोलविण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या केन ऍग्रो साखर कारखान्यात केलेल्या कर्ज पुरवठय़ावरून संचालकांत दुफळी निर्माण झाली आहे. या कर्जाला 14 संचालकांनी विरोध करून त्याबाबतचे पत्र दिले आहे. तसेच राष्ट्रवादीचे आमदार व बॅँकेचे संचालक मानसिंगराव नाईक यांच्या भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनीही या कर्ज प्रकरणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील यांना टार्गेट केले होते. आमदार नाईक यांनी याबाबत सहकार मंत्र्यांकडे तक्रारही केली होती. त्याची दखल घेत बॅँकेची चौकशीही लावण्यात आली. त्यामुळे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे काही संचालक व बॅँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याविरुद्ध भाजपाचे खासदार संजय पाटील व राष्ट्रवादीचे आमदार व बँकेचे संचालक मानसिंगराव नाईक आणि त्यांचे समर्थक असा संघर्ष सुरू आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांनी केलेल्या चौकशीला शासनाने स्थगिती दिली आहे. चौकशीच्या मागणीचा वाद शमला असताना आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून संचालकांतील गटबाजी उफाळून आली. त्याचे पडसाद संचालक मंडळाच्या या शेवटच्या सभेत उमटले. जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील यांच्या राजीनाम्यासाठी संचालकांचा एक गट आग्रही आहे. कडू-पाटील यांना कार्यमुक्त करण्याची मागणीही केली आहे. मात्र, केन ऍग्रोच्या कर्ज प्रकरणावरून त्यांचा राजीनामा घेतला जात असल्याने खासदार संजय पाटील गटाने याला विरोध केला. कडू-पाटील यांचा राजीनामा घेतला गेला, तर केन ऍग्रो कारखान्याच्या कर्जाचा प्रश्नाला बगल देण्याचा हा प्रयत्न असल्याची शक्यता असल्याचे खासदार पाटील गटाला वाटत होते. त्यामुळे संचालक मंडळाची बैठक सुरू झाल्यानंतर खासदार पाटील गटाचे काही संचालक बॅँकेत आले. कडू-पाटील यांना बोलावून चर्चा करण्यासाठी ते बाहेर घेऊन गेले.
शासकीय विश्रामधाममध्ये खासदार पाटील गटाचे नऊ संचालक उपस्थित होते. साखर कारखाने व संस्थाची अनियमित कर्जे नियमित करण्याच्या दृष्टीने मीटिंगमध्ये विषय होणार आहे. बैठकीत नेहमीप्रमाणे संचालकांच्या हजेरीपत्रकावर सह्या घेतल्या जातात आणि त्यानंतर ठराव घुसडले जातात, तसेच बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी मोठय़ा नेत्यांची नावे सांगून राजीनामा मागितला होता. आम्ही सर्व संचालक बाहेर होतो. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कडू-पाटील यांना बाहेर घेऊन आलो. बँकेच्या हितासाठी राजीनामा देऊ नये, असा पवित्रा घेतला. जिल्हा बँक शेतकऱयांची असून, ती वाचली पाहिजे, अशी भूमिका घेतल्याचे खासदार पाटील यांच्यासह नऊ संचालकांनी स्पष्ट केले.
सीईओ कडू-पाटील बराच वेळ बॅँकेत परतलेच नाही. इकडे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह संचालक त्यांची संध्याकाळपर्यंत वाट पाहत होते. मात्र, ते रजेवर गेल्याने त्यांच्याकडील मुख्य कार्यकरी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार सरव्यस्थापक बी. एम. रामदुर्ग यांच्याकडे देण्यात आला आहे.
बॅँकेच्या प्रभारी सीईओपदी रामदुर्ग
जिल्हा बॅँकेचे सीईओ जयतंव कडू-पाटील यांना संचालक मंडळाची बैठक सुरू असताना काही संचालकांनी बोलवून सभागृहाबाहेर नेले. यानंतर कडू-पाटील सायंकाळी उशिरापर्यंत बॅँकेत परतले नाहीत. त्यांची संचालक मंडळाने वाट पाहिली, पण ते बॅँकेत न आल्याने त्यांच्याकडील मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार सरव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र, कडू-पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही. संचालक मंडळाच्या बैठकीत केन ऍग्रोसह अन्य कोणताच विषय अजेंडय़ावर नव्हता. विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत आहे. त्यामुळे संचालकांच्या सत्कारासाठी सभा बोलावण्यात आली होती, असेही ते म्हणाले.
राजीनामा दिलेला नाही – जयवंत कडू-पाटील
राजीनाम्याबाबत जयवंत कडू-पाटील म्हणाले, संचालक मंडळाच्या बैठकीत मला राजीनामा देण्यास सांगितले. मी त्यास तयार झालो. त्यावेळी खासदार संजयकाका पाटील सभागृहाच्या बाहेर आले. त्यांनी मला बोलाविले. त्यांनी मला गाडीतून विश्रामधामला नेले. तेथे बँकेचे इतर संचालक हेते. त्यांनी मला तुम्ही राजीनामा देऊ नका असे सांगितले. त्यामुळे मी अद्याप राजीनामा दिलेला नाही. सोमवारी कामावर हजर होणार आहे.



























































