
कोळसाटंचाईमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वीजटंचाईची परिस्थिती असली तरी मुंबईकरांना कोणतेही टेन्शन नाही. सध्या मुंबईची विजेची दैनंदिन मागणी तीन हजार मेगावॅटच्या घरात आहे. सदरची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध असल्याचे अदानी इलेक्ट्रीसिटीसह बेस्टने स्पष्ट केले.
अदानी इलेक्ट्रीसिटीकडून उपनगरात सुमारे 1600 मेगावॅट विजेचे वितरण केले जाते. कोल इंडियाकडून पुरेशा कोळशाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे डहाणू वीज केंद्रातून अखंडित वीजनिर्मिती होणार आहे, असे अदानी इलेक्ट्रीसिटीने स्पष्ट केले आहे. तसेच बेस्टकडून टाटा पॉवरसोबत 676 मेगावॅट, साईवर्धा पॉवरसोबत 100 मेगावॅट आणि इतर अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसोबत वीज खरेदी करार आहेत.
































































