
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील ‘अ’ गटातून श्रीलंकेने लागोपाठच्या दोन विजयासह सुपर-12 मध्ये धडक दिली आहे. दुसरीकडे नेदरलॅण्डचे दोन पराभवासह आव्हान संपुष्टात आले आहे. याचबरोबर आयर्लंड आणि नामिबिया यांनी एक–एक विजयासह आपले आव्हान राखले आहे. मात्र आयर्लंड–नामिबिया हेच दोन संघ उद्या शुक्रवारी भिडणार असून यातील जो संघ जिंकेल तो सुपर-12 गाठणार आहे. ही अखेरची साखळी लढत असल्याने ‘अ’ गटातून सुपर-12मध्ये प्रवेश करण्यासाठी हे दोन्ही संघ मैदानावर जिवाचे रान करताना दिसणार आहेत.
आयर्लंडचे पारडे जड
इंग्लिश क्रिकेटचा वारसा असलेल्या आयर्लंडचे पारडे हे नामिबियापेक्षा जड असणार आहे. सलामीच्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध पराभूत झालेल्या आयर्लंडने दुसऱया लढतीत नेदरलॅण्डवर दणदणीत विजय मिळवला. नामिबियानेही नेदरलॅण्डवरच रोमहर्षक विजय मिळवला होता. मात्र आयर्लंड हा फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षण या तिन्ही स्तरावर चांगली कामगिरी करणारा संघ आहे. अनेक बलाढय़ संघांना त्यांनी याआधी पराभवाची धूळ चारलेली आहे. नामिबियाची श्रीलंकेपुढे 96 धावांत दाणादाण उडाली होती. त्यामुळे आयर्लंडला ते आव्हान देतील असे वाटत नाही.
श्रीलंका-नेदरलॅण्ड लढतीची औपचारिकता
श्रीलंका संघ टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-12 फेरीत प्रवेश करून निश्चिंत झाला आहे, तर दुसरीकडे नेदरलॅण्ड संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने त्यांच्याकडेही गमावण्यासारखे काहीच नसेल. त्यामुळे ‘अ’ गटात उद्या होणाऱया उभय संघांमधील लढत म्हणजे केवळ औपचारिकता असेल. श्रीलंका संघातील बाकावर बसलेल्या खेळाडूंना उद्या संधी मिळेल. नेदरलॅण्डचा संघही या मोठय़ा व्यासपीठावर न खेळलेल्या खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. श्रीलंका या लढतीकडे फक्त हात साफ करण्याच्या दृष्टिकोनातून बघत असेल.
गोलंदाजीत आयर्लंड सरस
कुर्टिस वॅम्फर (4 बळी), जोशुआ लिटिल (5 बळी) व मार्वै एडेर (5 बळी) असा प्रतिभावान गोलंदाजांचा ताफा आयर्लंडच्या दिमतीला आहे. कर्णधार अॅण्ड्रय़ू बालवर्नीने श्रीलंकन गोलंदाजीचाही समर्थपणे प्रतिकार केला होता.
आजच्या लढती (अ गट)
नामिबिया विरुद्ध आयर्लंड
शारजा, दुपारी 3:30 वाजता
श्रीलंका विरुद्ध नेदरलॅण्ड
शारजा,रात्री 7:30 वाजता



























































