
महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल, डिझेलची दरवाढ ही महागाईला इंधन पुरवत आहे. इंधन महागल्याने वाहतूक महागली आणि त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्यावर झाला आहे. गॅस दरवाढीने सर्वसामान्यांना हैराण केले आहे. इंधन आणि व्यावसायिक गॅसच्या दरवाढीमुळे आता हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थही महागणार आहेत. येत्या काही दिवसांत मेन्यू कार्ड 30 टक्क्यांनी फुगणार आहे.
कोरोना संकटामुळे हॉटेल व्यवसायाचे जबर नुकसान झाले. हॉटेल्स पुन्हा सुरू झाली असली तरी खर्च वाढला असून उत्पन्न घटले आहे. त्यात इंधन आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीने आणखीनच भर घातली आहे. कोरोना काळातील नुकसान भरून काढण्यासाठी किंबहुना व्यवसायात टिकून राहण्यासाठी खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्याशिवाय हॉटेल चालकांना पर्याय राहिलेला नाही, असे ‘आहार’ संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे नवे वाढवण्यात येणारे दर 1 जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे. प्रत्येक हॉटेल चालकाचा खर्च हा वेगवेगळा असतो. त्यामुळे तेथील पदार्थांचे दरही वेगवेगळे असतात.
व्यावसायिक सिलिंडरचा दर एक हजार रुपये होता. आता घरगुती गॅस सिलिंडर एक हजारांजवळ पोहोचला आहे आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर दोन हजारांजवळ. गॅस सिलिंडरचा वापर प्रत्येक हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये होतो. छोटय़ा हॉटेलांना रोज दोन तर मोठय़ा हॉटेलांना पाच सिलिंडर्स लागतात. सिलिंडरचे दर वाढल्याने खर्चही वाढला आहे. हॉटेलमध्ये लागणाऱया वस्तू, वीज बिल, कामगारांचे पगार, सामान खरेदी यावरही खर्च होतो. तो भागवण्यासाठी उत्पन्न वाढले पाहिजे आणि खाद्यपदार्थांचे दर वाढवणे हाच त्यावर उपाय आहे असे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.
सध्याचे दर
- मेदूवडा सांभार 70 रु.
- मिसळ पाव 65 रु.
- मसाला डोसा 70 रु.
- साधा डोसा 55 रु.
- चहा 25 रु.
- कॉफी 35 रु.
- शाकाहारी थाळी150 रु.
खाद्यपदार्थांचे दर किमान 30 टक्क्यांनी वाढवल्याशिवाय टिकून राहणे कठीण आहे, असे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.

























































