
घरात पाळीव प्राणी असतील तर घर बंद करून बाहेर जाणं हे एक आव्हान असतं. घरात कधी कधी अशी चार पायांची मंडळी उच्छाद मांडून ठेवतात आणि नुकसान होऊ शकतं.
अशीच एक घटना इंग्लंड येथील डर्बी येथे घडली आहे. येथे राहणाऱ्या सारा होलिंग्ज या तरुणीकडे एक ससा पाळला आहे. तिचा अत्यंत लाडका असलेल्या या सश्याचं नाव बिंक्स असं आहे.
सारा ही व्यवसायाने हवाई परिचारिका आहे. त्यामुळे तिला वेळी अवेळी फ्लाईट्सनुसार जावं लागतं. ज्यावेळी ती घराबाहेर असते, तेव्हा ती त्याला पिंजऱ्यात बंद करून जाते.
मात्र, एक दिवस ती बिंक्सला पिंजऱ्यात बंद करायचं विसरली. पण, जेव्हा ती घरी आली तेव्हा तिला हसू की रडू ते कळेना. कारण, बिंक्सने 2000 डॉलरचं सामान कुरतडलं होतं. यात तिची महागडी ब्रँडेड बॅग होती. तिचे बूट देखील होते. हिंदुस्थानी किंमतीनुसार, या सामानाची किंमत सुमारे 2 लाख रुपये इतकी होते.
तिच्या म्हणण्यानुसार, बिंक्स हा आकाराला छोटा दिसला तरी प्रचंड उपद्व्यापी आहे. तो माझे कपडे कुरतडतो. इतकंच नव्हे तर माझे केसही त्याने कुरतडून टाकले आहेत.




























































